ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या प्रभावी अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गंगाजल’, ‘गुंडा’, ‘मृत्यूदंड’, ‘गुंडाराज’, ‘बिल्ला नंबर ७८६’, ‘अंत’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी आजवर काम केलेलं आहे. मात्र, हिंदी सिनेविश्वात एवढं काम करूनही त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीत कोणाशीही मैत्री केली नाही. नुकत्याच ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी सांगितलं आहे.
“हिंदीतल्या कामाचा अनुभव कसा होता? एकेकाळी तुम्ही हिंदी कलाविश्व गाजवलं होतं. प्रत्येक सिनेमात तुमची भूमिका असायची”, यावर मोहन जोशी म्हणाले, “तेव्हा माझ्याकडे ‘सिनेमा’ नावाचं मासिक यायचं. त्यात संबंधित महिन्यात रिलीज होणाऱ्या सगळ्या सिनेमांची यादी यायची तसेच चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत त्यांची नावंही दिली जायची. माझ्या आईला सवय होती…मोहन जोशी असं नाव दिसलं की, ती माझ्या नावाखाली अंडलाईन करायची. एका मासिकामध्ये असे माझे २८ सिनेमे होते. तिने सगळीकडे माझं नाव अंडलाईन करून ठेवलं होतं. मी तेव्हा चिक्कार काम करायचो….कामाची खरंच कमी नव्हती.”
“हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचं झालं तर, उगवत्या सूर्याला नमस्कार…तुमच्याकडे काम असेल तर वाहवा करतील, मराठीतही तेच आहे. एकंदर सगळीकडे तेच आहे. त्यामुळे मैत्री वगैरे या सगळ्यापासून मी जरा दूरच राहिलो. मित्र बनवले नाहीत. पण, मराठीत खऱ्या अर्थाने माझे चांगले मित्र झाले ते म्हणजे अतुल परचुरे, विनोद पंडित आणि अशोक शिंदे हे तिघं माझे जवळचे मित्र! अमेरिकेत मला दीपक करंजीकर भेटले. मात्र, हिंदीत मी सर्वांपासून लांबच राहिलो. कारण, अनेक उदाहरणं मी पाहिली होती…ए के हंगल, राजेश खन्ना असे बरेच कलाकार आहेत. कलाकाराकडे काम नसेल तर कुणीही विचारत नाही.” असं मोहन जोशींनी सांगितलं.
दरम्यान, मोहन जोशी नुकतेच ‘देऊळ बंद २’ सिनेमात झळकले होते. प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला. यामध्ये मोहन जोशींनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. आजारपणानंतर या सिनेमासाठी मोहन जोशींनी प्रचंड मेहनत घेतली होती. २०२२ मध्ये त्यांना स्ट्रोक आला होता. आजारपणानंतर जवळपास दीड-दोन वर्षांनी त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत कमबॅक केलं.
