‘माहेरची माणसे’, ‘दुनिया करी सलाम’, ‘अष्टविनायक’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे रमेश भाटकर(Ramesh Bhatkar). ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’ अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या. त्याबरोबरच त्यांनी अनेक नाटकांमध्येही मुख्य भूमिका केल्या होत्या. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. आता त्यांच्या पत्नीने एका मुलाखतीत रमेश भाटकर यांच्याबरोबरील सहजीवनावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमचा जो काही ४० वर्षांचा संसार होता…

लोकप्रिय अभिनेते रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले, “माझं आणि रमेशचं कॉलेजमध्ये असताना आमचं आधी जवळजवळ तीन वर्षांचं अफेअर होतं. २४ डिसेंबर २०१८ ला आम्ही आमच्या लग्नाची ४० वर्षं पूर्ण केली होती. आम्ही दोघंही एकत्र वाढलो. मी पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर मी लॉ (Law)चं जे शिक्षण घेतलं, ते मला रमेशनं शिकवलं. त्यानं स्वत: खूप काम केलं. मी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. तसा विरोध नव्हता; पण त्यांना वाटलं की, मृदुलाला आणखी काहीतरी वेगळं त्यांच्या आवडीचं, असं हवं होतं. पण, या सगळ्यातून आमचा अतिशय उत्तम संसार झाला. जेव्हा आमचं लग्न झालं, त्यावेळी रमेशकडे बँक बॅलन्स फक्त १६ रुपये होता. पण आमचा जो काही ४० वर्षांचा संसार होता, तो १६ आणे झाला. म्हणजे संसार करताना आणि प्रेम करताना तिथे पैसा महत्त्वाचा नसतो. प्रेम असेल, तर संसार होतोच”, असे म्हणत रमेश भाटकर यांच्याबरोबरच्या सहजीवनाचे कथन मृदुला भाटकर यांनी केले.

याच मुलाखतीत मृदुला भाटकर यांनी ‘हे सांगायला हवं’ हे पुस्तक का लिहिलं याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “हे पुस्तक म्हणजे आमच्या दोघांची गोष्ट नाही. किंवा एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचा खोटा आरोप होतो, मग काय होतं? असंही ते पुस्तक नाही. ही जी गोष्ट आहे किंवा हा जो अनुभव आहे हा आपल्या सबंध सिस्टीममध्ये कसा अन्याय होऊ शकतो किंवा सोशल मीडिया यामध्ये काय भाग घेतं किंवा राजकारणी लोक या सबंध सिस्टीमला कसे वापरतात, याचं ते एक डॉक्युमेंटेशन आहे, असं मला वाटतं. रमेशवरती हा जो बलात्काराचा आरोप झाला होता, तो २००७ ला झाला होता. २४ डिसेंबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यानंतर लगेचच हा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल झालेला आहे हे त्याच्या दुसऱ्या दिवशी २५ डिसेंबरला आम्हाला कळलं. त्यानंतर साडेसहा वर्षं जी आमची सबंध लढाई चालू होती, ती लढाई आमच्या दोघांच्याही विश्वासाचा, न्यायसंस्थेवरच्या आमच्या विश्वासाचा, एकमेकांच्या सहनशीलतेचा कस पाहणारी होती.”

“रमेश ४ फेब्रुवारी २०१९ ला गेला. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी हायकोर्ट जज या पदावरून मी निवृत्त झाले. मला स्वत:ला त्या वेळेस एक रिकामपण आलं होतं. रमेशच्या जाण्याचं दु:ख होतं; पण मला काहीतरी वेगळं वाटतं होतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरला मी इतकी आजारी पडले की, सकाळी उठताना मला वाटायचं, पलंगाच्या बाहेर पडू नये. वास्तविक साधारणपणे रोज पाच ते सहा किलोमीटर चालणारी मी बाई आहे. मी भरपूर व्यायाम करते, सायकल चालवते; पण त्या वेळेस वाटायचं की, आपण खूप आजारी आहोत. डॉक्टरांनी मला नेहमीच्या टेस्ट सांगितल्या, त्या मी केल्या. जेव्हा मी त्याचे सगळे रिपोर्ट्स घेऊन गेले, त्या वेळेस ते म्हणाले की, तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. तुम्हाला एका मानसशास्त्रज्ञाची गरज आहे. कारण- तुम्ही डिप्रेशनच्या पहिल्या पायरीवरती उभ्या आहात. मला स्वत:ला कधी डिप्रेशनची शिकार व्हायचं नव्हतं. त्यावेळी मी विचार केला की, हे कशामुळे होतंय, नक्की काय आहे? मला लक्षात आलं की, आत आत कुठेतरी एक वेदना आहे. आतलं जे वादळ होतं, वेदना होती, जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत माझी त्यातून सुटका नाही. मग एका ऊर्मीतून मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली.”

हेही वाचा: “लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल…”, नव्या मालिकेविषयी काय म्हणाल्या हर्षदा खानविलकर? ‘ती’ इच्छा खरी ठरली…

२००७ साली रमेश भाटकर यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या सगळ्या अनुभवांवर मृदुला भाटकर यांनी ‘हे सांगायला हवं’ हे पुस्तक लिहिले आहे. मराठी, तमीळ, इंग्रजी या भाषांमध्ये हे पुस्तक आहे. या पुस्तकात सात वर्षे दिवगंत अभिनेते रमेश भाटकर यांच्यावर चाललेला खटला, त्याचे परिणाम काय झाले, याबद्दलचे त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. या काळात मृदुला भाटकर या न्यायमूर्ती होत्या.

दरम्यान, ४ फेब्रुवारी २०१९ ला रमेश भाटकर यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mridula bhatkar reveals late actor ramesh bhatkar had a bank balance of just rs 16 at the time of marriage also share why she wrote book nsp