मराठी सिनेविश्वात सध्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे अशी जबरदस्त स्टारकास्ट या सिनेमात आहे. हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आणि रिलीज झाल्यापासून मराठी कलाविश्वातील कलाकारांसह प्रेक्षकांनी देखील या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांसह या सिनेमाचं यश पडद्यामागील कलाकारांचं देखील आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या सिनेमाचा दिग्दर्शक शिवराज वायचळ तसेच ओंकार गोखले आणि विक्रांत पवार यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. हे सगळेजण विराजस व शिवानी यांचे मित्र आहेत. त्यामुळे मृणाल कुलकर्णींनी या कलाकारांचा प्रवास फार आधीपासून पाहिला आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना नकळत त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांची पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात…

मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट

प्रिय शिवराज, ओंकार आणि विकी…

सर्वप्रथम तुमचं अत्यंत मनापासून कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा!! गेली वीस-एक वर्षे मी तुम्हाला अत्यंत जवळून पाहते आहे आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची धडपड, तीव्र इच्छा आणि तुमचे अपरिमित कष्ट याची मी साक्षीदार आहे .सुरुवातीपासून जवळजवळ तुमचं सगळं काम मी बघितलं आहे आणि म्हणूनच आज मी म्हणू शकते की, आम्हाला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो!

‘आता थांबायचं नाय’ या अप्रतिम चित्रपटाविषयी आतापर्यंत लिहून आलेला शब्द न् शब्द खरा ठरेल असा अनुभव काल घेतला आणि हे सगळं आपल्या घरातल्या मुलांनी केलं याचं इतकं मनापासून कौतुक वाटत होतं की, चित्रपट बघताना डोळ्यात पाणी येतच होतं पण, तुमच्या विचारांनी डोळ्यात आनंदाश्रू येत होते. हे क्षेत्र सोपं नाही याचा अनुभव तुम्ही घेतच आहात… मात्र आपल्या विषयावर, तो मांडण्याच्या पद्धतीवर ठाम राहून तुम्ही इतकी मोठी मोट बांधलीत! ‘झी स्टुडिओज’ तुमच्या पाठीशी उभे राहिले आणि आज सगळी प्रसार माध्यम तुमचं भरभरून कौतुक करत आहेत.. तुमच्याबद्दल भरभरून लिहित आहेत. विराजस आणि शिवानीचे मित्र एवढंच आपलं नातं नाही हे तुम्हाला माहितीये… आणि त्यामुळेच तुमचं पोटभर कौतुक करण्याची ही संधी मी बिलकुल सोडत नाही! माणूस चांगला असतो हे आवर्जून सांगण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात हा चित्रपट तुम्ही बनवला याचा विशेष आनंद होतो. हा विषय मांडण्यासाठी कसलेल्या कलाकारांनी तुम्हाला मनापासून साथ दिली यातच सगळं आलं!
तुम्ही बिलकुल थांबणार नाही आणि उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तम काम कराल याची आम्हाला खात्री आहे. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!

दरम्यान, मृणाल कुलकर्णींप्रमाणे शिवानी रांगोळे, विराजस यांनी देखील आपल्या मित्रांच्या सिनेमाचं ‘आता थांबायचं नाय’ म्हणत भरभरून कौतुक केलं आहे.