Mrinal Kulkarni : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सध्या ‘बंडखोर’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. महेश मांजरेकरांच्या ‘बंडखोर’ चित्रपटात त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त सध्या ‘बंडखोर’ची टीम विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच एका मुलाखतीत मृणाल कुलकर्णींनी आयुष्यात केलेल्या सगळ्यात पहिल्या बंडखोरीचा किस्सा सांगितला.
मृणाल कुलकर्णी ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “आज मी या विषयावर गमतीने बोलू शकते पण, तेव्हा ती माझ्यासाठी खूपच भीतीदायक गोष्ट होती असं मला वाटतं. विशेषत: माझ्या आई-वडिलांसाठी…आता मी आणि रुचिर आम्ही दोघंही एकमेकांना बालपणापासून ओळखत होतो. आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा एकत्र होतो. तेव्हाच रुचिरने मला प्रपोज केलं. रुचिरने मला प्रपोज केलं होतं तेव्हा मी अकरावीत होते आणि तो सेकंड इयरला होता. पहिल्याच दिवशी मी घरी येऊन सांगितलं की, मला रुचिरशी लग्न करायचंय.”

त्या पुढे म्हणाल्या, “आजही मला आठवतंय, तेव्हा मला माझी आई म्हणाली होती, अगं मला तो आवडतो, तो माझा बॉयफ्रेंड आहे किंवा आम्हाला पुढे जाऊन लग्न करायचंय…असे बरेच टप्पे यामध्ये असतात. तू मला पहिल्याच दिवशी सांगते आहेस की, मला रुचिरशी लग्न करायचंय. तेव्हा फार भीती वाटली होती…पण, नशिबाने सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. खरंतर, मी कल्पना केली होती त्यापेक्षाही आयुष्यात सगळं चांगलं झालं. पण, तेव्हा मी आई-बाबांविरोधात अगदी बंड केलं होतं, मला हाच पाहिजे. ती एक भोळेपणाची बंडखोरी होती, असं म्हणता येईल.”

“खरंतर, आमच्या दोघांच्याही घरून लग्नाला अजिबातच विरोध नव्हता. कारण, लहानपणापासून आमच्या घरचे, आमची दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होती. पण, उगाचच मी नावापुरती बंडखोरी केली होती.” असा किस्सा मृणाल कुलकर्णींनी सांगितला. दरम्यान, १० जून १९९० रोजी मृणाल यांनी रुचिर कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

‘बंडखोर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, हा चित्रपट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये मृणाल कुलकर्णींसह छाया कदम, तितीक्षा तावडे, पूजा कातुर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
