Mrinal Kulkarni Post For Virajas-Shivani : लोकप्रिय अभिनेता विराजस कुलकर्णी व अभिनेत्री शिवानी रांगोळे या दोघांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. या दोघांच्या सुखी संसाराला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने विराजसच्या आई व शिवानीच्या सासूबाई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
मृणाल कुलकर्णींनी विराजस आणि शिवानीचे गोड फोटो शेअर करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कुटुंबीयांचं एकमेकांशी फार घट्ट नातं आहे. शिवानी ही माझी सून नाहीतर माझी मुलगीच आहे असं मृणाल कुलकर्णी कायम सांगत असतात.
मृणाल कुलकर्णी लिहितात, “आप्पांच्या ( गोनिदा ) पडघवली कादंबरीत एक वाक्य आहे. “बायकांचं हे असं आहे! कुठलं तरी रोप कुठेतरी लागायचं आणि मग तिथलं पाणी, तिथली हवा या सगळ्याशी एकजीव होऊन जायचं!” स्वतःच्या बाबतीत हे लक्षात येत नाही. पण, सून घरात आली की मात्र याचा प्रत्यय येतो! एक छान मुलगी घरात येणं आणि तिचं हळूहळू आपल्यातलंच एक होऊन जाणं, हे किती सुखावह असतं याचा अनुभव गेली चार वर्ष घेतो आहोत…”
त्या पुढे म्हणतात, “विराजस आणि शिवानी आपापल्या पद्धतीने स्वतःची आणि एकमेकांची कामगिरी फुलवत आहेत. ‘फिल्टर कॉफी’, ‘शंकर जयकिशन’, ‘वरवरचे वधू वर’, ‘एक तिची गोष्ट’ आणि ‘कोहम्’ या साऱ्या प्रयोगात त्यांची एकमेकांना मस्त साथ आहे. विराजसने लिहिलेल्या नाटकाचं पहिलं वाचन जेव्हा ते दोघे मिळून आमच्यासमोर करतात तेव्हा आम्हा दोघांचेही चेहरे कौतुकाने फुललेले असतात. शेवटी संसार म्हणजे काय तर ‘एकमेकांबरोबर वाढणं, परस्परांच्या प्रगतीसाठी साथ देणं’ हे त्यांना छान उमगलं आहे.”
“राधा ( शिवानीची आई ) आपली गुणी मुलं त्यांची सारी स्वप्नं पूर्ण करतील याची खात्री आहे आम्हाला आणि तुम्हालाही!! आपले संस्कार आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचल्याचा प्रत्यय आपल्याला येतोय यासारखं भाग्य नाही! खरं ना? विराजस आणि शिवानी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम… सदैव आनंदी राहा!” अशी सुंदर पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णींनी लेकाला अन् सुनेला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, या पोस्टवर चाहत्यांनी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवानी व विराजस हे दोघंही सध्या रंगभूमीवर सक्रिय आहेत. आता प्रेक्षकांची लाडकी शिवानी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केव्हा करणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
