मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून त्यांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मृणाल कुलकर्णी त्यांच्या कामाबरोबरच फिटनेसमुळेही चर्चेत असतात. आपला दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मृणाल कुलकर्णींनी वैयक्तिक आयुष्यात १० जून १९९० रोजी रुचिर कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली.

मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पतीसाठी खास पोस्ट लिहित काही फोटो शेअर केले आहेत. मृणाल-रुचिर यांच्या लग्नाला आता ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्रीने खास अंदाजात पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं लग्न अवघ्या १९ व्या वर्षी झालं होतं.

हेही वाचा : कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

“त्याला फोटो बिटो आवडत नाहीत… तिला फोटो बिटो आवडतात… वर्षानुवर्षे अनेक बाबतीत हे असंच चालू आहे आणि वर्षानुवर्षे हे असंच चालू राहणार!!! कारण… प्रेम म्हणजे प्रेम असतं… आता फोटोंचा क्रम तुम्हीच ठरवा बुवा! १० जून २०२४” अशी पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णींनी पतीला काहीशा हटके अंदाजात लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मृणाल यांना त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले असं अभिनेत्रीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे. मृणाल आणि रुचिर यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतं. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याचं मॅशअप पाहिलंत का? त्यांची लेक गार्गी फुले पाहून म्हणाल्या, “कमाल…”

दरम्यान, सध्या मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवत आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याशिवाय त्याची पत्नी शिवानी रांगोळे सुद्धा छोट्या पडद्यावरची आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते. या तिघांनी गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.