Mrunmayee Deshpande Lifestyle and Travel: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही ‘कट्यार काळजात घुसली’, ‘सुभेदार’, ‘फर्जंद’, ‘बोगदा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘शिकारी’, ‘चंद्रमुखी’, ‘फतेशिकस्त’ अशा अनेक चित्रपटांतील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘तू बोल ना’ या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेत्रीला ‘कुंकू’ या मालिकेतूनही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. तसेच, ती काही रिअॅलिटी शोंचे सूत्रसंचालनही करते.

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. अनेकदा तिच्या महाबळेश्वरमधील शेतीचे व्हिडीओ ती शेअर करते. तेथील उपक्रमांबद्दल ती माहिती देते. काही वेळा शेतात कोणती पिके घेतली आहेत, कोणत्या प्रकारे पिकांची लागवड केली आहे, हेही पाहायला मिळते.

आता अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडीओ महाबळेश्वरमधील नसून ऑस्ट्रेलियातील आहे. मृण्मयी तिच्या पतीसह सुट्यांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. या व्हिडीओमध्ये तिने काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या मोटरहोमची झलक दाखवली आहे.

मृण्मयी देशपांडेची ऑस्ट्रेलियात ‘रॉयल सफारी

या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “सध्या मी ऑस्ट्रेलियात आहे. तुम्हाला हे ठिकाण दिसत आहे, ते कॅम्पिंग ग्राउंड आहे. ऑस्ट्रेलियात आम्ही एक मोटरहोम भाड्यानं घेतलं आहे. गेले १५ दिवस आम्ही या गाडीमधून फिरतोय आणि पुढचे १५ दिवससुद्धा आम्ही याच गाडीमधून फिरणार आहोत.”

पुढे ती म्हणते, “आमच्या तात्पुरत्या भाड्याच्या घराची एक छोटीशी टूर करूया.” त्यानंतर पुढे मृण्मयी मोटरहोममधील गोष्टी दाखवते. या घराची झलक ती दाखवते. या मोटरहोममधील जेवण बनवण्याचे ठिकाण, भांडी स्वच्छ करण्याचे ठिकाण ती दाखवते. ती यावेळी म्हणते, “आम्ही रोज घरचं खातोय. काही वेळा प्रसिद्ध ठिकाणचे पदार्थ खाल्ले जातात; पण इतर वेळी आम्ही घरचं खातो. पण, इथे स्वयंपाक करत असताना, तुम्हाला आवडेल ते ठिकाण तुमच्यासमोर असते. नदीकाठी, जंगलामध्ये थांबून आम्ही स्वयंपाक करून खाल्ला आहे.”

मोटरहोममधील झोपण्याचे ठिकाण दाखवत मृण्मयी म्हणते, “इथे आम्ही झोपतो, इथला दरवाजा उघडा ठेवला तर, अप्रतिम निसर्ग बघत झोपता येतं.” तसेच, ते साहित्य कुठे ठेवतात हेही तिने दाखवले.

व्हिडीओमध्ये मृण्मयीचा पती स्वप्नीलचीही झलक दिसते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मृण्मयीने लिहिले, “आमच्या सुंदर मोटरहोममध्ये तुमचं स्वागत आहे. या प्रवासात मजा आहे, साहस आहे आणि स्वतःला नव्यानं शोधण्याचा एक सुंदर अनुभव आहे.”

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील अनेक मराठी चाहत्यांनी आम्हाला भेटा, असेही लिहिले आहे; तर काहींनी त्यांच्याकडे असलेल्या मोटरहोमबद्दल सांगितले. तर, काहींनी आयुष्याकडे बघण्याच्या या जोडप्याच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.