Mrunmayee Deshpande announces to stop screening of Manache Shlok Film: मृण्मयी देशपांडेचा मराठी चित्रपट ‘मनाचे श्लोक’ नावामुळे वादात अडकला आहे. शुक्रवारी, १० ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पुण्यात आरडाओरडा करून शो बंद पाडण्यात आले. हा विरोध पाहता दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने मोठा निर्णय घेतला आहे.

‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाची झलक पाहून किंवा चित्रपटाच्या शीर्षकामुळे हिंदू धर्म व संस्कृतीशी संबंधित व्यक्तींच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, चित्रपटाच्या शीर्षकासाठी मनाचे श्लोक या शब्दांचा वापर करणे समर्थ रामदास स्वामी यांच्या अनेक अनुयायांचा अनादर करण्यासारखे आहे. त्यामुळे, चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने गुरूवारी, ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत ‘मनाचे श्लोक’ सिनेमा प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे शुक्रवारी चित्रपट सगळीकडे रिलीज झाला. पण त्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवत असल्याचं मृण्मयी देशपांडेने जाहीर केलं आहे.

मृण्मयी देशपांडेची पोस्ट

“मनाचे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत. आणि नवीन नावासह हा चित्रपट येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा प्रदर्शित करत आहोत. भेटुयात!” अशी पोस्ट मृण्मयी देशपांडेने इन्स्टाग्रामवर केली आहे.

‘मनाचे श्लोक’ या नावावरून होणारा विरोध मावळताना दिसत नाहीये. तसेच पश्चिम महाराष्ट्रात चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. हायकोर्टाने प्रदर्शनाला हिरवा कंदील दिल्यानंतरही महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता चित्रपटाचं प्रदर्शन थांबवत असल्याचं मृण्मयी देशपांडेने जाहीर केलं आहे.