नाटक, मालिका असो किंवा चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वेने प्रत्येक माध्यमांत स्वत:चा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. मुक्ताचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘जोगवा’, ‘मंगलाष्टक वन्समोअर’, ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटांच्या यशानंतर आता लवकरच मुक्ताचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मे महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकची सध्या सर्वत्र चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘नाच गं घुमा’ या गाण्यावर सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मुक्ताने प्रमुख भूमिका साकारली असून तिच्यासह नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, तिथून पकडलेल्या आरोपींनी गुन्हे शाखेला दिली मोठी माहिती
अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त बाहेरगावी आहे. त्यामुळे चित्रपटातील या लोकप्रिय गाण्यावर अभिनेत्रीने परदेशात डान्स केला आहे. ‘नाच गं घुमा’ या गाण्यावर मुक्ताने सातासमुद्रापार लाल रंगाचा पैठणी ड्रेस परिधान करून जबरदस्त डान्स केला आहे. वॉशिंग्टन येथील स्केगिट व्हॅली ट्यूलिप फेस्टिव्हलला अभिनेत्रीने भेट दिली होती. त्यावेळीच मुक्ताने हा भन्नाट डान्स केला.
दरम्यान, मुक्ताने केलेल्या डान्सवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. स्वानंदी टिकेकर, सुकन्या मोने, पूर्वा फडके यांच्यासह तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स केल्या आहे. “मुक्ता जबरदस्त डान्स”, “तू सुद्धा कायम डान्स करत जा”, “मी पहिल्यांदाच तुला डान्स करताना पाहिलं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी मुक्ताच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.