Mukta Barve Shares funny incident: मुक्ता बर्वे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता नुकताच तिने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे, ज्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. मुक्ता बर्वे नेमकं काय म्हणाली, ते जाणून घेऊ…
“आठ दिवसांनंतर मी माधुरी दीक्षितसारखी…”
मुक्ता बर्वे व्हिडीओ शेअर करीत म्हणाली, “मी अकरावीत असताना घरी न सांगता, माझी मैत्रीण अदितीबरोबर हेअरकट करायला गेले होते. हेअरकट झाला, ज्यांनी माझा हेअरकट केला होता. त्या बाई मला म्हणाल्या की, हा हेअरकट आता कसाही दिसत असला तरीही आठ दिवसांनी तो माधुरी दीक्षितच्या हेअरकटसारखा दिसेल. त्या म्हणण्यावर माझा आणि अदितीचा ठाम विश्वास बसला. त्यामुळे मला वाटू लागले की, आता हा हेअरकट कसाही दिसू दे; पण आठ दिवसांनंतर मी माधुरी दीक्षितसारखी दिसणार आहे.”

पुढे काय घडले हे सांगताना मुक्ता म्हणाली, “तो हेअरकट करून मी घरी गेले आणि आईचा प्रचंड ओरडा खाल्ला. पण, मी एकटीनंच ओरडा खाल्ला नाही, तर मी आणि अदितीनंही ओरडा खाल्ला. ही अदिती माझी अकरावीपासूनची मैत्रीण आहे. आजपर्यंत आमची मैत्री तशीच टिकून आहे. फक्त होतं असं की, कामाची क्षेत्रं बदलली, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतलं. त्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या. तिला मी खूप वर्षांत भेटले नाही. मला आठवत नाही की, किती वर्षं झाली. अदिती मला तुझी खूप आठवण येते. आपण, अधे मधे फोनवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो; पण भेटून कट्टा टाकायला खूप वर्षं झाली. त्यामुळे मला तुला भेटायला नक्की आवडेल.

पुढे मुक्ता म्हणाली, “आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर अशी अनेक जवळची माणसं येतात. पण, काही कारणानं त्यांच्याशी संपर्क तुटतो आणि खूप वर्षांत त्यांच्या भेटीगाठीही होत नाहीत.”
शेवटी प्रेक्षकांना व्हिडीओ शूट करून, तिच्या नवीन नाटकाच्या पेजला टॅग करण्याचे आवाहन केले. ती म्हणाली, “तर तुमच्या आयुष्यात असं कोण आहे, त्यांना तुम्हाला पुन्हा भेटायला नक्की आवडेल? हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी व्हिडीओ शूट करून पुन्हा नक्की भेटू या. नवीन नाटकाच्या पेजला टॅग करायला विसरू नका.

मुक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी मुक्ता बर्वे यांना कमेंट करीत लिहिले, “हेअर कट वगैरे ठीक आहे; पण मुक्ता बर्वेसारखा अभिनय कुठून आणायचा?” एका नेटकऱ्याने हसण्याच्या इमोजी शेअर करrत लिहिले, “तुम्ही दोघी आठ दिवसांनी त्या पार्लरमध्ये गेला नाहीत?” दुसऱ्या एकाने लिहिले, “आजही तुमचा हेअरकट सुंदर आहे. तुम्हीही गोड आहात.” एकाने लिहिले, “खरे सांगायचं तर मॅडम तुम्ही माधुरी दीक्षितपेक्षा खूप छान दिसता.” एकाने लिहिले, “मला तर मुक्ता बर्वे व्हायचंय; मला तुमचा आहे तो हेअर कट आवडला.”
मुक्ता बर्वे लवकरच नवीन नाटक ‘पुन्हा नक्की भेटू’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने याबद्दल खुलासा केला होता. आता तिच्या आधीच्या कलाकृतींप्रमाणेच तिच्या नवीन नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
