एखाद्यात स्वत:ला वेड्यासारखं गुंतवून घेऊन, त्यात अपेक्षित प्रेम-ओलावा शोधत ऊर फुटेपर्यंत धावायला लावणारीही मायाच असते आणि कधीतरी खरोखरच मायेची ओल मनाला स्पर्शून गेली असेल तर अबोल, अव्यक्त प्रेमाची भावनाही आपल्याला आतून शांत करते, स्थिर करते, खंबीर करते. त्या अर्थाने मायेचीही शहाणीव असायला हवी, याची जाणीव करून देणारी, भान आणणारी गोष्ट आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ चित्रपटात पाहायला मिळते. दरवेळी आशयघन, भावगर्भ, आतून काहीतरी काळजाला हात घालत आसवांना मोकळी वाट करून देणारीच अनुभूती गरजेची नाही. त्या अर्थाने ‘माया’ ही खूप साधी-सरळ आणि थेट आयुष्य आहे तसं आनंदाने स्वीकार करण्याचं शहाणपण देणारी आहे.

‘माया’ या चित्रपटाची कथा स्वत: दिग्दर्शक आदित्य इंगळे आणि समीर वसंत कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. मराठी चित्रपटांमध्ये सध्या हुशारीने मानवी भावभावना हाताळणार्‍या कथा मांडणार्‍या लेखक – दिग्दर्शकांचं कौतुक करायला हवं. चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर खूप विचारपूर्वक केले जातात, जेणेकरून तुम्हाला मूळ गोष्टीचा पत्ता लागणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा असो वा नाकारलं जाणं असो किंवा कुठल्याही कारणांवरून आयुष्याला मिळालेलं वळण असो… त्याचा स्वीकार किंवा त्याची पडछाया घेऊन होणारा त्यांचा वावर हे सगळे संदर्भ समकालीन आहेत.

आजच्या परिस्थितीला धरून जगणारी पात्रं जेव्हा तुमच्यासमोर येतात, तेव्हा ती गोष्ट आणि तुम्ही यांच्यात अंतर राहात नाही. दूर कुठेतरी लंडनमध्ये एकटीच फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणारी माया, तिचं रोजचं एकटीने जगणं, रुग्णालयाकडून आलेल्या पेशंट्सना उपचार देणं, त्यासाठीचा प्रवास, घरी आल्यावर एकटीने जेवण गरम करून खाणं, झोपणं, सकाळी उठून पुन्हा तीच दिनचर्या सांभाळणं हे एका सरळ रेषेसारखं सुरू आहे. या सरळ रेषेतील जगण्याला महेशसारख्या अडेलतट्टू, वरकरणी हट्टी वाटणार्‍या रुग्णाच्या निमित्ताने वळण मिळतं. महेशबरोबर त्यांचा मित्र आनंद, मुलगा सिद्धार्थ, नात मीरा अशी नवीनच पात्रं मायाच्या भावविश्वात प्रवेश करतात.

तोपर्यंत लंडनमध्ये तिला सांभाळून घेणारी मामी वगळता मायाच्या मनात फारसा कुणी शिरकाव केलेला नसतो. या नव्या माणसांच्या येण्याने मायाच्या भूतकाळाने मनावर पांघरलेला कोरडेपणा हळूहळू गळून पडतो. तरीही माणसाचं मन नेमकं कुठल्या खडकात मायेचा पाझर शोधत राहील आणि आनंदाचं बीज अंकुरलं जाईल, याचा नेमका माग लागणं कठीण याची जाणीव लेखक – दिग्दर्शकाने मायाच्या माध्यमातून नकळत करून दिली आहे.

या चित्रपटाची कथा ही लंडनमध्ये घडते. आपल्या लोकांपासून दूर असल्याने जाणवणारा एकटेपणा जो मायाच्या गोष्टीसाठी आवश्यक होता त्याची गरज या शहराने पूर्ण केली आहे. सोयीसुविधा, मोठमोठाली घरं, मनात भरून घेण्यासाठी असलेला खुला निसर्ग अनुभवता याव्यात अशा कैक जागा… सगळं असतानाही मायाला जाणवणारा एकटेपणा हा तिच्या तिथल्या वावरातूनही दिग्दर्शकाने सहज जाणवून दिला आहे. बहुधा तिच्यातला एकटेपणा पाहणार्‍यालाही जाणवावा इतका पुरेसा वेळ घेत-देत अतिशय संथ पद्धतीने चित्रपट पुढे जातो. सतत वेगवान पाहायची, क्रियेला ठाशीव प्रतिक्रियाच देताना पाहण्याची सवय असलेल्या आपल्या मनाला तितका संथपणा सुरुवातीला कंटाळवाणा वाटू शकतो.

पण म्हणून पुढे एका अंतराने कथा वेग घेते वगैरे… असं काही होत नाही. चित्रपटाच्या कथेत नाट्य आहे की नाही. तर नक्की आहे आणि ते त्यांच्या जगण्यातून प्रेक्षकाला नेमकं समजतं. पण मानवी भावभावना-संवेदना या ठाशीवपणे करून दाखवल्याशिवाय प्रेक्षकांना समजत नाहीत, या आपल्याकडच्या एकूणच दृश्यमांडणीच्या ठोकताळ्याला दिग्दर्शकाने यात पूर्ण फाटा दिला आहे. आपल्याबरोबर नेमकं काय योग्य घडलं-अयोग्य घडलं याचा सारासार विचार करणं, आपल्या भावभावना मोकळेपणाने व्यक्त करणं, व्यक्तीस्वातंत्र्य जपणं या गोष्टी आजच्या काळात तुलनेने अधिक सहजशक्य आहेत. प्रेम, लग्न, जोडीदार, मातृत्वाची भावना, मायेची ओढ या सगळ्याचा अधिक सजग, डोळस स्वीकार आणि त्यासाठीच्या पर्यायांची निवड अधिक खंबीरपणे केली जाऊ शकते, याचं भान ‘माया’सारख्या चारचौघींपैकीच एक असलेल्या तरुणीच्या माध्यमातून करून देणं हे एकाअर्थी या चित्रपटाचं बलस्थान आहे. त्या अर्थानेही चित्रपट प्रगल्भ आहे. 

मोजकीच पात्रं आणि त्यासाठी उत्तम कलाकारांची निवड. सिद्धार्थ चांदेकरच्या व्यक्तिमत्त्वातला गोडवा, अतिशय प्रगल्भ आणि समंजस अशी विजय केंकरे यांनी साकारलेली व्यक्तिरेखा, रोहिणी हट्टंगडी यांची प्रेमळ, सुंदर आणि आधुनिक मामी हे खूप छान जमून आलं आहे. महेश यांच्या भूमिकेत अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यापेक्षा दुसर्‍या कोणाची कल्पना करणंच कठीण. आणि अर्थातच मायाच्या सगळ्या छटा खूप समजून उमजून जगणारी मुक्ता बर्वे या मोजक्या कलाकारांच्या सहज अभिनयामुळे ‘माया’ अधिक अर्थपूर्ण अनुभूती देतो. मनोरंजनाच्या रूढ चौकटी बाजूला ठेवून केलेली मांडणी सगळीकडून चोखच आहे असं नाही, पण काहीएक भूमिका घेऊन प्रयोगशील मांडणी करण्याचा प्रयत्न मात्र या चित्रपटातून निश्चित जाणवतो.

माया

दिग्दर्शक – आदित्य इंगळे

कलाकार – मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, डॉ. गिरीश ओक, विजय केंकरे, सिद्धार्थ चांदेकर.