Mukta Barve on Jogwa: मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जोगवा’ हा सिनेमा २००९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २००९ च्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय व चित्रपटातील गाणी या सगळ्यांमुळे चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. आता अभिनेत्री मुक्ता बर्वेने एका मुलाखतीत जोगवा या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे.

‘जोगवा’बद्दल मुक्ता म्हणाली…

मुक्ता बर्वेने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, आज तुला वयाच्या या टप्प्यावर जर तुला ‘जोगवा’ करायला मिळाला असता, तर तुला काय वाटतं की, तू कसा केला असतास? त्यावर मुक्ता म्हणाली, “मी जास्त समजून-उमजून केला असता आणि मला वाटतंय की, ते कथेसाठी मारक ठरलं असतं.”

मुक्ता पुढे म्हणाली, “त्या वयाचा भाबडेपणा होता ना, जो माझ्या डोळ्यांत दिसतो, तो आज मी आणूच शकत नाही. जे जग सुलीला कळत होतं, ते जग सिनेमा करत असताना मलाही कळत होतं. त्याची भीती वाटत होती. उत्सुकता वाटत होती. त्याची खंत वाटत होती.”

“राजीवनं संजय जाधवच्या मदतीनं अत्यंत सुंदर पद्धतीने तो सिनेमा शूट केला. पण, मी आधी खूप अभ्यास करून गेले होते. मी थिएटरची मुलगी आहे. मी कशी बसेन, उठेन, मी नाक टोचलं, डॉक्युमेंट्री बघितल्या आणि इतर गोष्टी मी केल्या होत्या. पण, जिथे आम्ही शूट करायला गेलो, तिथे मी दोन दिवस आधी गेले होते. काही सोशल वर्कर आणि जोगते-जोगतिणी आमच्याबरोबर होते, ते आम्हाला मदत करीत होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर जे साक्षात्कार झाले. ते शब्दांत समजावून सांगू शकणार नाही.”

मुक्ताने सांगितला अनुभव

अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक अनुभव सांगितला. ती म्हणाली, “सौंदतीला जिथे खरी लग्नं होतात, तिथेच आमच्या लग्नाचा सीक्वेन्स शूट केला गेला. आसपास आमच्या खरी लग्नं चालली होती. त्या शूटिंगदरम्यान एक वेळ अशी आली की, मी राजीवकडे गेले आणि त्याला विनंती केली की, या सीनचं शूटिंग आपण लवकर संपवूया का? मला असह्य होतंय. मला इथे थांबणं असह्य होतंय. मी अभिनय करीत होते. पण, तिथेच कोणाचं तरी खरंच लग्न लागत होतं. ते उद्यापासून जोगते-जोगतीण असणार होते आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या हातात राहणार नव्हतं. त्या रूढी आणि परंपरांबद्दल मला वाईट बोलायचं नाही. पण, त्यामागे अंधश्रद्धेत लपलेल्या काही लोकांची आयुष्यं कायमची कोमेजली.”

“हे मी वयामुळे…”

“आमच्याबरोबर एक जोगता होता, तो चाळिशीचा असेल. तेव्हा मला ते खूप मोठे वाटले होते आणि त्या माणसाला त्यातून बाहेर पडायचे होते. तो साडी नेसायचा. तो म्हणाला की, मी आता यातून बाहेर पडू शकत नाही. माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं. मला यातून बाहेर पडायची खूप इच्छा आहे. पण, मी आता दुसरं काही करूही शकत नाही. तर मला असं वाटतं की, कदाचित आता मी त्या भूमिकेत तितकी बरी दिसणार नाही, जितकी मी तेव्हा दिसले होते. हे मी वयामुळे म्हणत नाही. समजूतीमुळेच गडबड होईल.”

मुक्ता पुढे म्हणाली, “तुमच्या निरागस आयुष्याची वाट लागताना जी गोष्ट निरागस डोळ्यांतूनच दिसू शकते आणि म्हणून तेच योग्य होतं, असं मला वाटतं”, असे म्हणत मुक्ताने ‘जोगवा’ चित्रपट शूटिंग करतानाच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच, वयाच्या या टप्प्यावर ती भूमिका साकारू शकते, यावरही तिने वक्तव्य केले.