मराठी नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमांत मुक्ता बर्वेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’ या नाटकाद्वारे मुक्ताने व्यावसायिक रंगभूमीवर तिचं पहिलं पाऊल ठेवलं होतं. या पहिल्याच नाटकात तिला दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी यांच्याबरोबर सुद्धा मुक्ताची जवळची मैत्री होती. प्रत्येक भूमिकेसाठी मुक्ता विशेष मेहनत घेते, तिचा सिनेक्षेत्रातील अभ्यास दांडगा आहे. मुक्ताने करिअरच्या सुरुवातीलाच अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे. याबद्दल तिने संदीप कुलकर्णी यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुक्ता बर्वेला ‘कबड्डी कबड्डी’ नाटकाच्या निमित्ताने विनय आपटे यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली होती. या नाटकासाठी मुक्ताची जेव्हा निवड झाली तेव्हा तिला खूप दडपण आलं होतं…वडील-मुलीच्या नात्याची या नाटकाची गोष्ट होती.
मुक्ता बर्वे याबद्दल सांगते, “मी पहिल्या नाटकात रसिकाबरोबर काम केलं होतं…रसिका जोशी, निखिल रत्नपारखी, सुप्रिया मतकरी…त्या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम होते. या सगळ्या कलाकारांकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या सगळ्या नटांबरोबर काम करताना आपल्यावर नकळत काही संस्कार होतात आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात.”
“पुढे, ‘कबड्डी कबड्डी’ या नाटकात मला विनय आपटे सरांबरोबर काम करायचं होतं. रंगीत तालीम सुरू असताना सुद्धा मी प्रचंड दडपणात होते, मला भयंकर टेन्शन आलं होतं. त्यावेळी रसिका तालीम पाहायला आली होती…रसिका तेव्हा मला म्हणाली होती, ‘मुक्ता तू काम छान करत आहेस…चुकत काहीच नाहीये. पण, तुझ्याकडे पाहून असं वाटतंय की, तू विनय आपटेंबरोबर काम करत आहेस…पण, नाटकातल्या भूमिकेनुसार तू तुझ्या वडिलांबरोबर काम करतेस असं वाटत नाहीये’. रसिकाने जे काही सांगितलं… तो माझ्यासाठी एक स्विच होता…मी त्यावर विचार केला.”
“कमी अनुभव असलेली नटी एका मोठ्या अभिनेत्याबरोबर काम करतेय असं प्रेक्षकांना वाटायला नको. तर, याउलट वडिलांसमोर एक कमी अनुभव असलेली लहान मुलगी आहे असं प्रेक्षकांना दिसलं पाहिजे…आणि या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. मोठ्या नटासह काम करण्याचं प्रेशर आणि वडिलांची भीती या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हा फरक मला रसिकामुळे जाणवला…कारण, माझ्या रंगीत तालमीला रसिका, सुप्रिया यांना मी नेहमी बोलवायचे. माझे जवळचे मित्र-मैत्रिणी जे काही चुकतंय ते नेहमी मला खरं-खरं सांगतात. रसिका त्यावेळी माझ्या सगळ्या नाटकांची रंगीत तालीम पाहायला यायची. सुप्रिया अजूनही येते.”
