मुक्ता बर्वे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत. जोगवा, मुंबई पुणे मुंबई, नाच गं घुमा, डबल सीट, स्माईल प्लीज, आम्ही दोघी, एकदा काय झालं असे तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत.

अभिनेत्री कायमच तिच्या भूमिकांमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचा चाहतावर्गही मोठा आहे. मुक्ता सोशल मीडियावरही काही वेळा पोस्ट शेअर करून, तिच्या भावना व्यक्त करते. नुकताच मातृदिन झाला. त्या निमित्ताने तिने आईबरोबरचे काही खास फोटो शेअर केले होते.

“तेच मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न…”

मुक्ताच्या बालपणापासूनचे हे फोटो आहेत. हे सुंदर फोटो शेअर करीत मुक्ताने लिहिले, “प्रिय आऊ, तुला ओळखणारे कोणीही भेटतात तेव्हा सांगतात की, तुला बघितलं की अगदी बर्वेबाईंचा, बर्वेकाकूंचा, बर्वेमावशीचा, तुझ्या आईचाच भास होतो, वाटतं तुझी आईच समोर आली. काय गंमत वाटते, माहितीये?”

मुक्ताने असेही लिहिले, “माझे लहानपणचे फोटो बघून वाटतं की, मी किती वेगळी दिसत होते. गोल चेहरा, किलवरसारखं त्रिकोणी नाक, कुरळे केस, उंची सगळंच वेगळं. मी मोठी होत होते, छोट्या शाळेतून मोठ्या शाळेत, तिथून कॉलेज, मग करिअर. या सगळ्या प्रवासात तू कधीच मला मी कशी दिसते, दिसायला पाहिजे याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. मात्र, मी कशी असायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे याबद्दल मात्र तू कायम ठाम आणि आग्रही होतीस, आजही आहेस. स्वतःच्या पायांवर उभी राहा, जे काम करशील त्यावर मनापासून प्रेम कर, जीव ओतून, मन एकाग्र करून कष्ट कर, तुझे १०१ % दे, स्वतःचे निर्णय स्वतः घे म्हणजे त्यांची जबाबदारी निभावता येते, भरभरून जग, जगण्यातला आनंद शोधत राहा… हे आणि असं बरंच काही, जे तुझ्या जगण्यातून मला शिकवतेस. तेच मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न करते आहे. हा प्रवास हळूहळू सुरू झालाय आणि मी आपोआप थोडी थोडी तुझ्यासारखी दिसायला लागलेय बघ. आहे की नाही गंमत?”

तिने पुढे असेही लिहिले, “तू जशी आहेस आणि आम्ही मुलांनी जसं व्हावं, असं तुला वाटतं त्यासाठी तुला घट्ट मिठी.” शेवटी तिने असेही लिहिले की, आऊ, शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष कर. तुझ्याविषयी लिहिते आहे ना म्हणून नेहमीप्रमाणे तुझ्याकडून तपासून घेता आलं नाही.”

नेटकरी म्हणाले…

मुक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “किती गोड”, दुसऱ्या एकाने लिहिले, “अगदी सारखे हसू आहे”, एकाने लिहिले, “खूप खूप छान… आई लेक अगदी सहज ओळखता येतात”, आणखी एकाने लिहिले, “तुझ्यासारखंच गोड लिहिलं आहेस”, एकाने लिहिले, “मुक्तादीदी, आता तू अगदी आईसारखीच दिसतेस”, एकाने लिहिले, “सुंदर. माझ्या आईचासुद्धा असाच फोटो होता. डोळ्यांसमोर येतोय; पण मला सापडतच नाही. तुमचा फोटो बघून खुप छान वाटलं.” एकाने लिहिले, “किती सुंदर लिहिलं आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, मुक्ताला नवीन सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.