Marathi Actor Om Bhutkar Wedding Photo : ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजेच अभिनेता ओम भूतकर. सिनेविश्वात अल्पावधीतच आपल्या अभिनय शैलीने ओमने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. आजवर ‘रावरंभा’, ‘श्यामची आई’, ‘आता थांबायचं नाय’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये त्याने काम केलेलं. ओमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आजवर फारशी कुणालाच माहिती नव्हती. कारण, अभिनेता सोशल मीडियावरच सक्रिय नव्हता. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुद्धा प्रायव्हेट आहे. मात्र, नुकतीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
ओम भूतकर लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ओमने गुपचूप लग्नगाठ बांधत त्याच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
ओम भूतकरच्या लग्नाला अभय महाजन, अलोक राजवाडे, अभिनेत्री पर्ण पेठे असे अनेक कलाकार उपस्थित होते. “ओमजी लग्नाची शपध घेताना, एक ‘प्रेरणा’दायी क्षण” असं कॅप्शन देत अभिनेत्याच्या जवळच्या मित्राने त्याच्या लग्नसोहळ्यातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ओमच्या पत्नीचं नाव प्रेरणा सेठिया आहे. प्रेरणा सेठिया Wildlife Conservationist आहे, असं तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलं आहे.
ओमच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांसह मराठी कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
ओमबद्दल सांगायचं झालं तर, तो उत्तम अभिनेता आहेच याशिवाय त्याच्या ‘सुखन’ कार्यक्रमाचे देखील असंख्य चाहते आहेत. हा उर्दू साहित्यावर आधारित संगीत कार्यक्रम आहे. याचं संकलन आणि दिग्दर्शन स्वत: ओमने केलं आहे. कथाकथन (दास्तानगोई), गझल, नझ्म (कविता) आणि सुफी संगीत यांचा सुंदर संगम यात पाहायला मिळतो.

याशिवाय त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच तो ‘तुंबाडची मंजुळा’ सिनेमात झळकला आहे. आता लवकरच तो नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ सिनेमातही झळकणार आहे.
