Murlidhar Mohol On Pravin Tarde: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची मैत्री कायमच चर्चेचा विषय असते. प्रवीण तरडेंनी अनेक मुलाखतींत मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला. त्यानिमित्ताने प्रवीण तरडेंनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्येसुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडेंसाठी केली पोस्ट
आता मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्यांनी प्रवीण तरडेंसाठी लिहिली आहे. त्यांनी लिहिले, “गोष्ट मोठी, १०० कोटी; अभिमान… मित्राच्या यशाचा.”
पुढे त्यांनी लिहिले, “बालपणापासूनचा माझा जिवलग मित्र आणि आज मराठी चित्रपटसृष्टीतील सलग सहा सुपरहिट चित्रपट देणारा लेखक, दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे याच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करीत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या देदीप्यमान यशानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होताना मन अतिशय आनंदाने आणि अभिमानाने भरून आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलारज यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.”
“बालपणापासून आजपर्यंत आम्ही एकमेकांचा प्रवास जवळून पाहिला आहे. संघर्ष, कष्ट, स्वप्नं आणि त्यासाठी घेतलेली अथक मेहनत, या प्रत्येक टप्प्याचे आम्ही साक्षीदार आहोत. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, एका सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रवीणने आपल्या जिद्द, प्रतिभा आणि अविरत परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर असंख्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. एक मित्र म्हणून त्याच्या या यशाचा मनापासून अभिमान वाटतो. ‘देऊळ बंद २’च्या या ऐतिहासिक यशासाठी प्रवीण आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! मराठी चित्रपटसृष्टीला अशीच नवनवी शिखरे गाठत राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा “, असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडेंना शुभेच्छा दिल्या.
तसेच, कार्यक्रमात कोण कोण हजर होते, याबद्दलही त्यांनी लिहिले. त्यांनी लिहिले की, कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, चित्रपटाचे निर्माते कैलाश वाणी, सिटी प्राइड थिएटर्सचे चाफळकर बंधू, अभिजित पानसे, मंगेश देसाई, स्नेहल प्रवीण तरडे, श्री. प्रसाद ओक, महेश लिमये, संजय जाधव, अवधूत गुप्ते, आदीनाथ कोठारे, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, अभिजित खांडकेकर, विजू माने, डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत, दिग्दर्शक उपस्थित होते. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कार्यक्रमातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले.
