Nagraj Manjule Amey Wagh : नागराज मंजुळे हे मराठी सिनेमात वेगळ्या धाटणीच्या आणि मातीतल्या कथा सांगणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वास्तवदर्शी आणि आशयघन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांनी मराठी सिनेविश्वामध्ये पहिला १०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘सैराट’ सिनेमा दिला. सिनेविश्वातील या योगदानानंतरही नागराज मंजुळे यांनी लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा त्यांच्यापेक्षा जास्त सीनियर असल्याचे वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांचा ‘फ्रेम’ चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये कॅमेरामॅन म्हणून दोघांची कथा मांडण्यात आली होती. नागराज मंजुळे हे अनुभवी, तर अमेय हा नवोदित कॅमेरामन अशा भूमिका दोघांनी साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशनमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये नागराज हे अमेयला माझ्यापेक्षा जास्त सीनियर असल्याचे म्हणाले होते.

अमेय खूप अनुभवी माणूस – नागराज

‘कलाकृती मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेय वाघला नागराज मंजुळे यांच्याबरोबर काम करताना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर अमेय म्हणाला, “त्यांच्या अनेक गोष्टींचं मी निरीक्षण करीत होतो. त्यामुळे त्यांच्या गोष्टी वेचणं हे माझं काम होतं.” त्यावर नागराज मंजुळे म्हणाले, “खरं तर हा प्रश्न अमेयला विचारला जातोय; पण माझ्या अवतारावरून असं वाटत असेल की, मी फार सीनियर वगैरे आहे आणि मी त्याला काही गोष्टी शिकवायला पाहिजे; पण अमेय खूप अनुभवी माणूस आहे,'”

अमेय जास्त सीनियर – नागराज मंजुळे

पुढे नागराज मंजुळे म्हणाले, “तो काही स्वतंत्रपणे शिकत असेल, तर तो त्याचा भाग आहे; पण माझ्याकडे त्याला शिकवण्यासारखं काहीही नाही. अमेय हा माझ्यापेक्षा या इंडस्ट्रीमध्ये जास्त सीनियर आहे. त्यानं या इंडस्ट्रीमध्ये जास्त काम केलं आहे.” मग अमेयने हसून प्रतिक्रिया देत, खरं तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी त्यांच्याकडून हा विनम्रपणा शिकलोय,” अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.

पुढे अमेय वाघने नागराज मंजुळे यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला आवडत असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर गप्पा मारायला खूप आवडतात. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडतं. कारण- त्यांचा एकूणच गोष्टींकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच मुळात मला खूप वेगळा आणि रोमांचक वाटतो. त्यातून बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात येतात आणि मी त्यातून शिकत जातो. त्यांच्याशी बोलल्यानंतर कोणत्याही गोष्टीकडे असंसुद्धा बघता येतं, हे पण लक्षात येतं.”

नागराज मंजुळेंबद्दल काय म्हणाला अमेय वाघ?

पुढे अमेय वाघ म्हणाला, “नागराज मंजुळे यांना एखाद्या विषयातील खरेपणाचं भयंकर अप्रूप आहे. त्यांच्या स्वतःच्या कामातही त्यांचा खरेपणा आणि सच्चेपणा आहे म्हणूनच ते लोकांना इतकी वर्षं भावत आले आहेत. एखाद्या गोष्टीमध्ये खरेपणा दिसला, तर तो वेचणारे पहिले नागराज मंजुळे असतात. त्यांच्या ती गोष्ट लगेच लक्षात येते आणि ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे,”

अमेय वाघचा हा एक तोटा – नागराज मंजुळे

नागराज मंजुळे यांनी पुढे अमेय वाघ खूप तरुण दिसत असल्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “अमेय वाघचा एक तोटा आहे की, तो खूप तरुण दिसतो. त्याचं जे काही वय आहे, त्यापेक्षा अमेय खूप तरुण दिसतो. त्यामुळे त्याच्या अनुभवांकडे दुर्लक्ष होतं. अमेय हा अनुभव आणि जाणतेपणाच्या जोरावर वरचढ ठरतो, कारण- तो खूप हुशार माणूस आहे,” यावर अमेयने त्याने डॉक्टर श्रीराम लागूंबरोबरसुद्धा काम केल्याचे सांगितले आहे.