मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच छान आहे. नुकताच ‘सुपर डुपर’ हा मल्टीस्टारर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत आणि नम्रता संभेराव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. निर्मिती सावंत यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी आजवर बऱ्याच सिनेमांसह मराठी मालिका आणि नाटकांमध्येही काम केलेलं आहे.
निर्मिती सावंत यांचा सिनेमा- नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. मराठी सिनेविश्वातील कलाकार सुद्धा या अभिनेत्रीचे फॅन आहेत. निर्मिती सावंत यांच्याबरोबर नम्रता संभेरावची सुद्धा खूप छान मैत्री आहे. या दोघींना यापूर्वी प्रेक्षकांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहिलं होतं. आता दोघीही ‘सुपर डुपर’मध्ये एकत्र झळकल्या आहेत. सध्या हा सिनेमा सुद्धा हाऊसफुल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नम्रताने लिहिलेली एक सुंदर पोस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
नम्रता संभेराव लिहिते, “प्रिय दिदू, निर्मिती सावंत! मी किती नशीबवान आहे… मला ‘सुपर डुपर’ या सुपरहिट मराठी चित्रपटात तुझ्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एक उत्तम व्यक्तिमत्व आहेस. तुझ्यात खरंच एक निरागस बाळ आहे आणि तोच निरागसपणा प्रामाणिकपणा तुझ्या कामात आहे. खरंतर मी हे सगळं बोलण्यासाठी खूप लहान आहे . पण तू भारी आहेस… अशीच राहा कायम! माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…तुझी नमा! चित्रपटाचा चौथा आठवडा दणक्यात सुरु आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा ‘सुपर डुपर’!”
नम्रताने लिहिलेल्या या खास पोस्टवर निर्मिती सावंत यांनी कमेंट करत “माझी नमुडी…” असं म्हटलं आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा या सुंदर पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
‘सुपर डुपर’ सिनेमा ३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. दोन कुटुंबांना जेव्हा एकच प्लॅट विकला जातो तेव्हा काय गोंधळ उडतो याची मजेशीर गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतेय. यामध्ये निर्मिती सावंत, नम्रता संभेराव यांच्यासह ललित प्रभाकर, हृषिकेश जोशी, शशांक शेंडे, विदुला चौगुले या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
