Ashwini Bhave Tribute to Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त करीत नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. आता अश्विनी भावे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत नाना पाटेकरांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणार नाही अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

अश्विनी भावे काय म्हणाल्या?

अश्विनी भावे म्हणाल्या, “नमस्कार मंडळी. आपण सर्वांनीच एक उत्तम अभिनेता, मनस्वी जगणारा एक कलंदर माणूस आणि सामाजिक बांधिलकी कशी निभवावी, याचं उत्तम उदाहरण घालून देणारी असामान्य व्यक्ती गमावली आहे. नानाच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधी भरून निघेल असं मला तरी वाटत नाही.”

अश्विनी भावे पुढे म्हणाल्या, “नाटक असो, सिनेमा असो, त्याच्या प्रत्येक भूमिकेवर तुम्ही आम्ही सर्वांनीच भरभरून प्रेम केलं. तो अभिनेता उत्तम होताच; पण तो माणूस म्हणून जगला. तो कायम त्याच्या शर्तींवर जगला. आपल्या सगळ्यांनाच असं जगावं, अशी इच्छा असते; पण असं जगायला वेगळी हिंमत असावी लागते, जी नानाच्या प्रत्येक कृतीतून दिसते.”

त्या असेही म्हणाल्या, “मैत्री ही भावना असेल, वाङ्मयावरचं प्रेम, नाटकाच्या संहितेवरचं त्याचं प्रेम, सुरांवरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम, लष्करातल्या लोकांवर, त्यांच्या हिमतीवर त्यानं केलेलं प्रेम. प्रत्येक गोष्टीत तो दिलदारपणे व्यक्त व्हायचा. तो आपली पोतडी समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी उघडायचा आणि सढळपणे दान करायचा. दान पैशाचं, दान त्याच्या वेळेचं, दान त्याच्या मेहनतीचं असायचं. तो उत्तम माणूस होता, त्याचं मन खूप मोठं होतं.”

शेवटी त्या म्हणाल्या, “मला खरंच वाटत नाही की, अशी व्यक्ती पुन्हा होईल. त्याच्या या कलंदरपणातून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे आणि आमच्यासारख्यांना त्याच्यातील अभिनेत्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. नाना तू आम्हा सर्वांनाच जे जे दिलंस, त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि तू जिथे कुठे असशील, तिथे कार्यरतच असशील आणि तिथे तू असंच दिलदारपणे जगत असशील, याची मला खात्री आहे,” असे म्हणत अश्विनी भावे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्या भावूक झालेल्या दिसल्या.

हा व्हिडीओ शेअर करताना अश्विनी भावेंनी नाना पाटेकर आपल्या मनात कायम जिवंत असतील, अशा आशयाची कॅप्शन लिहिली आहे.

त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “खूप सुंदर शब्दांत नानांच्या जीवनावर बरंच काही बोललात”, “अशी व्यक्ती आणि नट पुन्हा होणे नाही”, “अगदी बरोबर. नानांचे जाणं मनाला चटका लावून गेलं. एक चांगला कलाकार आपल्यातून निघून गेला. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, “अगदी छान शब्दांत व्यक्त झालात. नाना सर म्हणजे मोठं व्यक्तिमत्त्व”, “खूप छान व्यक्त झालात. सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी याच भावना आहेत”, “अगदी योग्य शब्दांत व्यक्त झालात”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, नाना पाटेकर यांनी नाटक, मराठी-हिंदी सिनेमे या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.