ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनानंतर प्रत्येकजण हळहळला, नानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बुधवारी मुंबईत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आदरांजली सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी नानांबद्दलच्या भावुक करणाऱ्या आठवणी सांगितल्या. तसेच नानांनी त्यांना काही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी फार्महाऊस बांधण्याचं कारणही सांगितलं होतं.

पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले, “मी अगदी रंगभूमीपासून नानाचा प्रवास पाहिलाय. नानाला स्केचिंगची सुद्धा खूप आवड होती…पांढरा शुभ्र पेपर पाहिला की, तो चित्र किंवा स्केच काढायला सुरुवात करायचा. नानाची आणखी एक खासियत म्हणजे, चित्रपटाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्याने खूप काम केलं. नाना नेहमी गरजेचे फोन उचलायचा. असाच एकदा तो माझाही फोन उचलत नव्हता…शेवटी मी त्याला एक मेसेज पाठवला. ‘नानाSSSSSSSS…..’ असा भलामोठा मेसेज केला आणि दुसऱ्या क्षणाला त्याचा फोन आला, ‘काय रे असले मेसेज पाठवतोस’ मग मी म्हणालो, ‘असा मेसेज केला म्हणूनच तर तू सुद्धा ताबडतोब मेसेज केलास’ मध्यंतरी माझं पुस्तक आलं…त्यानंतर मग माझं आणि नानाचं फोनवर पाऊण तास बोलणं झालं. त्यानिमित्ताने मी त्याच्या शेतावर त्याला भेटायला गेलो होतो.”

पुरुषोत्तम बेर्डे पुढे म्हणाले, “नानाचं शेत खूपच सुंदर…तिथे एक मोठं तळं आहे. विहीर, बैलगाड्या, गायी, वाडा सगळंकाही आहे. मला त्याच्या शेतात फिरताना भरपूर कोंबड्या दिसल्या, तिथे ३५० कोंबड्या होत्या. पण, त्या कोंबड्यांना त्याने पाळलं होतं…त्यांना कधीच हात लावला नाही. असंच एकदा सकाळी फेरफटका मारताना मला नाना म्हणाला, ‘पुरषा…तिथे बघ, ती जागा आहे, तिथे माझा अंत्यविधी करा’ असं मी सांगून ठेवलंय. मी म्हटलं, नाना एवढ्या सकाळी कशाला हे बोलतोस? पुढे नाना म्हणाला, ‘आणि ही आजूबाजूची झाडं आहेत…ती त्याच्यासाठी वापरायची’ परवा…नानाची बातमी ऐकल्यावर अंत्यविधी कुठे होणार हे चौकशी करण्याची माझ्यावर वेळ आली नाही. कारण, ती जागा नानाने मला आधीच दाखवली होती. त्याच शेतावर, त्याच जागी त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.”

“नानाने ठरवलं होतं….माझा शेवट मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आजारपणात काढायचा नाहीये. मी पटकन जाणार. सगळं ठरवून…एखाद्या शूटिंगचं शेड्यूल प्लॅन करावं तशा पद्धतीने तो कायमचा निघून गेला. पण, तो कायम आपल्याबरोबर राहणार आहे. त्याचं फार्महाऊस पुण्यापासून जवळपास ३५ किलोमीटर आत आहे. मी त्याला विचारलं होतं, ‘अरे एवढ्या आत इथे कुठे तू फार्महाऊस घेतलंस?’ त्यावेळी तो मला म्हणाला होता, या सिंहगडाच्या पायथ्याशीच मला माझं फार्महाऊस हवं होतं कारण, इथूनच महाराजांचे मावळे एकेकाळी गेले असतील’ फार्महाऊसच्या बाहेर आलं की सिंहगड दिसतो…याचा त्याला फार अभिमान होता. त्याने फिटनेसवरही खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी ऐकल्यावर खरंच खूप धक्का बसला होता.” असं भावुक होत पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं.