Nana Patekar’s Fitness Secret: प्रत्येक व्यक्तीसाठी तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज व्यायाम करणे, चौरस आहाराला प्राधान्य देणे, काही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यामध्ये बदल करणे, वयानुसार व्यायामात बदल करणे; याबरोबरच फास्ट फूड टाळणे अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते.

अनेक कलाकार त्यांच्या दिनचर्येबद्दल विविध मुलाखती, सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा करतात. त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते यापासून ते त्यांच्या आहाराची, फिटनेसची कशी काळजी घेतात, तसेच ते किती वेळ व्यायाम करतात, त्यांचे डाएट कसे असते, अशा अनेक गोष्टींचा खुलासा करतात.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक डायलॉग गाजले आहेत. ते त्यांच्या फिटनेसवरही लक्ष देतात.

Award Banner

नाना पाटेकरांनी ‘बोल भिडू’ला मुलाखत दिली होती. या जुन्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य काय आहे हे सांगितले होते.

“शरीर हे माझं शस्त्र…”

नाना पाटेकर म्हणाले होते की, शरीर हे माझं शस्त्र आहे. ते नीट नसेल तर कसं होईल. आपण आपली गाडी कशी नीट ठेवतो, तशीच शरीराचीदेखील काळजी घेतली पाहिजे.

व्यायामाचे कोणते प्रकार तुम्हाला आवडतात, कोणते व्यायाम केले पाहिजेत? त्यावर नाना पाटेकर म्हणालेले, “तुमच्या सर्वांगाचा व्यायाम झाला पाहिजे. सगळंच करायचं, पण काही वेळा व्यायामशाळेत जाता येत नाही. त्यावेळी बैठक आणि सूर्यनमस्कार केले पाहिजेत, हे तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करते.

ते असेही म्हणाले होते, “मी आता ७५ वर्षांचा आहे, तरीसुद्धा अजूनही दोन-चार जणांना खांद्यावर घेऊ शकतो. मला त्याचं कौतुक वाटतं. मी कौतुकाने आरशात बघत असतो, ते करायला पाहिजे. आपल्याला आपण आवडलो तर जगण्याची गंमत वेगळी आहे. आपल्याला आपण आवडलो तर आपल्याला बाकीचेही आवडतील. आरशात बघताना स्वत:ची किळस आली तर जगण्यातली गंमत संपली.”

नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते यावर्षी ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेची चर्चा झाली होती. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासह अक्षय कुमार, संजय दत्त, रितेश देशमुख, श्रेयश तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, सौंदर्या शर्मा, अभिषेक बच्चन, फरदीन खान असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. ‘हाऊसफुल ५’ हा यावर्षी उत्तम कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.