Makarand Anaspure On Nana Patekar : मराठीसह हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळी छाप पाडणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. अभिनयाबरोबरच ते सामाजिक कार्यही करतात. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यात त्यांच्या साथीला मकरंद अनासपुरेसुद्धा आहेत.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची ही ओळख फक्त ‘नाम’ फाउंडेशनमुळे झालेली नाही. मकरंद अनासपुरे कॉलेजमध्ये असतानाच त्यांची नाना पाटेकरांशी ओळख झाली होती. त्याबद्दल स्वत: मकरंद अनासपुरेंनीच जुनी आठवण सांगितली आहे. मकरंद अनासपुरे यांना चित्रपटात येण्याची पहिली संधीसुद्धा नाना पाटेकरांनी दिली होती. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाना पाटेकरांबद्दल मकरंद अनासपुरे नेमकं काय म्हणालेत? चला जाणून घेऊ…

‘अशी’ झाली नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची पहिली भेट

अभिजात मराठी फिल्मी या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे नाना पाटेकरांबद्दल म्हणाले, “कॉलेजमध्ये असताना नाना पाटेकर आमची एकांकिका बघायला आले होते. १९९४ साली नेहरू सेंटरमध्ये ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ नावाची एकांकिका स्पर्धा झाली होती. तेव्हा कुणीतरी मान्यवर एक विषय द्यायचे आणि त्यावरच सर्वांना एकांकिका सादर करायची होती. ही स्पर्धा तीन फेऱ्यांत व्हायची. कुठलंही नाट्याचं तंत्र म्हणजे, लाइट्स किंवा सेट वगैरे न वापरता एकांकिका करायची होती. तेव्हा पुण्यातल्या प्राथमिक फेरीत आमची निवड झाली होती आणि त्याची अंतिम फेरी नेहरू सेंटरला झाली होती. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकरांना आमंत्रित करण्यात आलं होतं.”

“त्यांना प्रत्यक्षात पाहून…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितली आठवण

पुढे मकरंद अनासपुरे म्हणाले, “तेव्हा नाना पाटेकरांची एक वेगळीच क्रेझ होती. ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘परिंदा’ अशा अनेक चित्रपटांत एका मराठी अभिनेत्यानं आपलं नाव कमावलं होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप अप्रूप होतं. तेव्हा आमची एकांकिका शेवटची होती. मी नेहरू सेंटरच्या बाहेर असताना ते जीपमधून आले आणि त्यांनी मला ‘अरे, त्या औरंगाबादच्या मुलांची एकांकिका झाली का रे?’ असं विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना हो बोललो की नाही हेही मला आता आठवत नाहीय; पण त्यांना प्रत्यक्षात पाहून मी भारावूनच गेलो होतो. त्यांचा जुना ‘सावित्री’ सिनेमा पाहून मी त्यांचा चाहता झालो होतो. तर, अंतिम फेरीत त्यांनी आमची एकांकिका बघितली आणि नंतर येऊन असं म्हणाले की, ‘तुला बक्षीस मिळेल की नाही माहीत नाही. पण तू नंतर समोर असशील, तर मी तुझ्याबद्दल बोलेन.'”

“मग शेवटी भाषणात नाना पाटेकर म्हणाले की, ‘तू मुंबईला ये. तुझ्यासारख्या कलावंताचं काहीतरी होऊ शकतं. मी तुला मदत करेन’. मग त्यांनी मला ‘यशवंत’ नावाच्या चित्रपटात एक लहान भूमिका दिली. तसेच सहायक दिग्दर्शकाच्या यादीतही माझं नाव आहे. तेव्हापासून मी व्यावसायिक सिनेमामध्ये कार्यरत आहे. म्हणून मी त्यांना या क्षेत्रातले माझे गुरू मानतो. तसेच सुरुवातीच्या काळात ज्या आधाराची गरज असते, तो आधार त्यांनी मला दिला. त्यामुळेच माझ्या मनात नानांविषयी एक वेगळंच स्थान आहे.” असं शेवटी म्हणाले.