ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. नानांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नानांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर तातडीने गोव्याच्या दिशेने रवाना झाला. “मी सध्या पुण्यात आहे, लवकरच गोव्याला पोहोचतोय. मी यासंदर्भात सविस्तर निवेदन जारी करेन.” असं मल्हारने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितलं होतं. आता मल्हार पाटेकर गोव्यातील रुग्णालयात पोहोचला असून, त्याचा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रुग्णालयात पोहोचताच मल्हारला अश्रू अनावर झाले… त्याच्या चेहऱ्यावर दु:ख स्पष्ट दिसत आहे. वडिलांचं छत्र हरपल्यामुळे मल्हार पूर्णपणे खचला होता. यावेळी त्याच्याबरोबर असणाऱ्या काही लोकांनी त्याला आधार दिला. तर, काहीजण त्याचं सांत्वन करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

नाना पाटेकर आपल्या कुटुंबासह पुण्यात राहायचे. मात्र, त्यांचा अखेरचा काळ गोव्यात गेला. मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली, यावेळी त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला मेसेज केला होता. नानांचे मित्र पहाटे साधारण ४ वाजता त्यांच्या घरी पोहोचले. यादरम्यान रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वैद्यकीय पथक नानांच्या घरी पोहोचलं. “सीपीआर देता देता नानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहाटे ४.३० वाजता ते रुग्णालयात पोहोचले. तासभर सीपीआर दिल्यानंतर ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणीही नव्हते. त्यांचे केअर टेकर आणि मित्रपरिवार होता” अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली आहे.

दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे मृतदेह नेण्यात आला आहे. तर, अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे.