Nana Patekar Praises Ashok Saraf : रतन, मदन आणि चंदन ही त्रिकुट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कल्ला करण्यास सज्ज झालं आहे. ‘साडे माडे ३’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘साडे माडे ३’ला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता जवळपास २० वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव ही स्टारकास्ट एकत्र पाहायला मिळणार आहे. पण या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट असणार आहे. कारण त्यांच्या आयुष्यात कामिनीची एन्ट्री होते. चित्रपटात कामिनीची भूमिका केली आहे सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगूरूने. कामिनीच्या येण्याने तिघांच्या आयुष्यात नक्की काय बदल होतो? हे रूपेरी पडद्यावर पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे.

अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांना भाऊ म्हणून पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनासुद्धा या तिघांना पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेते नाना पाटेकरांनी यासंदर्भात एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अंकुश चौधरी याने नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर म्हणतात, “पुन्हा एकदा साडे माडे ३’. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि संजय जाधव ही सगळी या चित्रपटात पंचमहाभुते आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक अंकुश चौधरी आहे. हा (अंकुश) मला कधी दिग्दर्शक वाटतच नाही. तो कायम माझ्यासमोर नट म्हणूनच येतो. पण तो छान दिग्दर्शन करतो. पहिला ‘साडे माडे तीन’ सिनेमासुद्धा मला आवडला होता आणि आता तो दुसरा सिनेमा घेऊन येत आहे. अशातच यात रिंकू राजगुरूसुद्धा आहे. त्यामुळे यात काहीतरी नवीन असणार. कारण नव्याचा अट्टहास करणारी ही सगळी मंडळी आहेत.”

पुढे अशोक सराफ यांच्याबद्दल नाना पाटेकर म्हणतात, “अशोक… अजून किती वर्षे तू सुपरस्टार राहणार… पण मला याचा आनंद आहे. तुझ्यामुळे मला अनेक सिनेमांत संधी मिळाली. खूप वर्षे झाली, आपण एकत्र काम केलं नाहीय. अशा एखाद्या चित्रपटात काम करायला मला आवडेल. पण कुणी कास्टच करत नाही. असो… हरकत नाही. काम नाही, निदान हा चित्रपट पाहायला तरी मिळेल. सर्वांना शुभेच्छा. मी हा चित्रपट पुण्यात थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहीन. तुम्हीसुद्धा (प्रेक्षक) थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहा. यश मिळेल, याची मला खात्री आहे.”

दरम्यान, ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीवरही शोककळा पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळे या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. यात ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ हा सिनेमासुद्धा आहे.

याआधी ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्यानं आता हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.