अभिनेत्री गिरिजा ओक गेल्या काही महिन्यांपासून ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. तिचे निळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर मराठी कलाविश्वातून सुद्धा गिरिजावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अशा या ‘नॅशनल क्रश’च्या सासरच्या कुटुंबाबद्दल आज आपण जाणून घेऊयात… गिरिजा ओकने २०११ मध्ये निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. गिरिजा ही प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक श्रीरंग गोडबोले यांची सून आहे. तिची अन् सुहृदची पहिली भेट २००८ मध्ये आदित्य सरपोतदारच्या साखरपुड्यात झाली होती. त्यावेळी ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील अभिनेत्री म्हणून सुहृदला ती माहिती होती.

पुढे काही दिवसांनी एका प्रोजेक्टसाठी मानधन, शूटिंगच्या वेळा हे सगळं ठरवण्यासाठी सुहृदने गिरिजाला फोन केला होता. या प्रोजेक्टचं शूटिंग गोव्याला होणार होतं तेव्हा या दोघांची प्रत्यक्षात भेट झाली. त्यानंतर कालांतराने दोघांचेही सूर जुळले. गिरिजा ओक व सुहृद यांना एक मुलगा असून, त्याचं नाव आहे कबीर.

girija oak husband and son
गिरिजाचा नवरा व मुलगा

गिरिजा सोशल मीडियावर अनेकदा फॅमिली फोटो शेअर करत असते. गिरिजाचे सासरे दिग्दर्शक-लेखक श्रीरंग गोडबोले यांना मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत सगळेच ओळखतात. पण, तिच्या सासुबाई फारशा कधी कॅमेऱ्यासमोर आलेल्या नाहीत. अभिनेत्रीच्या सासूबाई गीता गोडबोले या कॉस्ट्यूम डिझायनर आहेत. त्या कायम आपल्या सुनेला पाठिंबा देतात, तिचे खूप लाड करतात.

girija oak father in law and mother in law
गिरिजाचे सासू-सासरे

गिरिजाच्या नणंदेचं नाव आहे मृण्मयी गोडबोले. या दोघींमध्येही सुंदर बॉण्डिंग आहे. मृण्मयीने आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये, वेबसीरिजमध्ये तसेच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

mrinmayee godbole
गिरिजाची नणंद मृण्मयी गोडबोले

सासूबाईंविषयी सांगताना गिरिजा एका मुलाखतीत म्हणाली होती, “मी खरं सांगू का…माझ्या सासूने माझे जास्त लाड केलेत. माझ्या आईने जरा मला शिस्तीत आणि धाकात वाढवलंय. आई मला सुट्टीच्या दिवशी सुद्धा सकाळी ७ वाजता उठवायची. पण, गीता ताई कायम तुला हवा तेवढा आराम कर असं सांगते. नऊ-दहा वाजेपर्यंत उठ. मी थोडं काही काम केलं की, ती आईला फोन करून सांगणार…अगदी सुगरण मुलगी आहे हो! आणि काय हवं? म्हणजे ती कायम खूश, आनंदी असते. माझा मुलगा कबीर प्रेमाने माझ्या सासूबाईंना गीता म्हणून हाक मारतो.”