Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 1: ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाचा हा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा बहुप्रतिक्षीत चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे.
शुक्रवारी, २० सप्टेंबरला ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ होता. याच दिवशी ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रदर्शित झाला. ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ असल्याने प्रेक्षकांना कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांत पाहण्याची संधी होती. या ऑफरचा फायदा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ला देखील मिळाला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळालं. ‘नवरा माझा नवसाचा २’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
‘नवरा माझा नवसाचा २’ चे कलेक्शन
नवा नवस अन् एसटीऐवजी रेल्वेचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही. पण मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी चित्रपटाने चांगली ओपनिंग केली आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये कलाकारांची मांदियाळी
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), स्वप्नील जोशी, हेमल इंगळे (Hemal Ingale), निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.