Navra Maza Navsacha 2 Movie First Poster : तब्बल १९ वर्षांपूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात आशीर्वाद घेऊन दिग्दर्शक – निर्माते सचिन पिळगांवकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टिझर व्हिडिओला अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे. येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : “महाराजांचा जयजयकार होताच हाताची घडी घालून गप्प…”, अरबाज पटेलवर प्रेक्षकांची नाराजी, नेमकं काय घडलं?
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर ( Navra Maza Navsacha 2 )
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे.
सचिन पिळगांवकर याबद्दल लिहितात, “गणपतीपुळ्याच्या नॉनस्टॉप कॉमेडीच्या प्रवासाचे प्रवासी confirmed झालेत. ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाचं थेट पोस्टर घेऊन आलेत. २० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…”
दरम्यान, पहिल्या भागात गणपती पुळ्याचा प्रवास सर्वांनी एसटीने केला होता. परंतु, आता या भागात सचिन पिळगांवकर त्यांच्या प्रवाशांसह हा प्रवास कोकण रेल्वेने करणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd