Marathi Actor On Sachin Pilgaonkar Trolling : सध्या सोशल मीडियाच्या काळात कलाकारांना त्यांच्या विविध मतांमुळे कायमच ट्रोल केलं जात असल्याचं दिसतं. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्षच करतात; तर काही या ट्रोलर्सना चांगलंच उत्तर देतात. सोशल मीडियावरील या ट्रोलिंगला अभिनेते सचिन पिळगांवकरांनासुद्धा सामोरं जावं लागलं आहे.
स्वत:च्या ट्रोलिंगबद्दल सचिन पिळगांवकरांनी कांही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. तसेच मराठीतल्या इतर काही कलाकारांनीसुद्धा त्यांना केल्या जात असलेल्या ट्रोलिंगबद्दल आपापलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. अशातच आता सचिन पिळगांवकरांच्या सिनेमात काम करणाऱ्या एका सहकलाकारानं सचिन यांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन पिळगांवकरांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमात काम केलेले विनोदी अभिनेते विकास समुद्रे यांनी सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगबद्दल मत व्यक्त केलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विकास समुद्रे म्हणाले, “त्यांच्या ट्रोलिंगबद्दल खूप वाईट वाटतं. तेव्हा सोशल मीडिया असता, तर तेव्हाही हे ट्रोलिंग झालं असतं. ‘शोले’ सिनेमाच्या वेळी त्यांनी कशी मदत केली, हे आता सोशल मीडियावर ऐकायला मिळतंय; पण आम्ही तर खूप पूर्वी हे ऐकलं आहे. २२ वर्षांपूर्वी आम्ही हे ऐकलं आहे. ते खोटं असतं, तर माणूस इतक्या वर्षांनी कट-टू-कट २० वर्षांनी तेच कसं काय बोलेल.”
सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगबद्दल वाईट वाटतं : विकास समुद्रे
पुढे ते म्हणाले, “सचिन पिळगांवकर असे कलाकार आहेत, ज्यांनी राज कपूर, गुरुदत्त यांच्याबरोबर काम केलं आहे. लहानपणीच त्यांना मोठमोठे पुरस्कार मिळाले आहेत. गुरुदत्त यांच्याबरोबर ते एका सिनेमात काम करणार होते; पण त्या सिनेमातल्या भूमिकेचं वय होतं सहा वर्षं आणि ते चार वर्षांचे होते. तेव्हा गुरुदत्त यांनी सचिन पिळगांवकरांना सांगितलं की, ही भूमिका सहा वर्षांच्या मुलाची आहे आणि तू चार वर्षांचा आहे. तेव्हा सचिनजी म्हणालेले, ‘मग मला घेणार नाही का?’ त्यावर गुरुदत्त म्हणाले, ‘मी दोन वर्षे वाट पाहीन’. दरम्यानच्या काळात गुरुदत्त यांचं निधन झालं. मग त्यांच्या भावानं तो सिनेमा पूर्ण केला आणि तोही सचिन पिळगांवकरांना बरोबर घेऊनच. त्यामुळे अशा कलाकाराला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबद्दल वाईट वाटतं.”
सचिन पिळगांवकरांना GenZ पिढीच ट्रोल करतेय : विकास समुद्रे
त्यानंतर विकास समुद्रे म्हणाले, “मी खात्रीनं सांगू शकतो की, ५०-६० वर्षांचा माणूस त्यांना ट्रोल करत नाहीय. आजची GenZ पिढी त्यांना ट्रोल करतेय. कारण- त्यांना काही माहितीच नाही. त्यांनी सचिन पिळगांवकरांना ओळखलेलंच नाहीय. सचिन सरांचा ऑराच (वलय) वेगळा आहे. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांच्यासारख्या महान लोकांबरोबर त्यांचं उठणं-बसणं होतं. तर त्यांचा ऑरा असणारच. लहानपणापासून ते बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या ट्रोलिंगबद्दल खूपच वाईट वाटतं.”
दरम्यान, विकास समुद्रे हे लोकप्रिय मराठी विनोदी कलाकार आहेत. त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात चिपळूणच्या प्रवाशाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्यांनी ‘कॉमेडी एक्स्प्रेस’, ‘फू बाई फू’ यांसारख्या विनोदी शोद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच काही लोकप्रिय नाटकांतून आणि सिनेमांतूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
