‘बायोस्कोप’ , ‘मोगरा फुलला’ , ‘बादल’, ‘नायक’, ‘हंगामा, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नीना कुळकर्णी होय. ‘देवयानी’, ‘ये है मोहब्बतें’, ‘उंच माझा झोका’, अधुरी एक कहानी’ अशा मालिकांतून त्यांनी नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या मात्र त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे निधन झाले आहे, अशी अफवा पसरली होती. मग त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत माझ्या निधनाची बातमी खोटी असून, मी जिवंत असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाल्या नीना कुळकर्णी?
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी निधनाच्या माहितीचे खंडन करत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत लिहिले, “माझ्या निधनाची एक खोटी बातमी यूट्यूबवर पसरत आहे. मी जिवंत असून स्वस्थ आहे. देवाच्या कृपेने कामात व्यग्र आहे. कृपया अशा अफवांना प्रोत्साहन देऊ नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करा. मला दीर्घायुष्य मिळो.”
याआधी लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याच्या निधनाचीदेखील अफवा पसरली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तो व्यक्त झाला होता. अशा अफवांमुळे नुकसान होऊ शकते. माझ्या कुटुंबीयांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना याचा त्रास होऊ शकतो, त्यांच्यावर याचा परिणाम होतो. त्यांच्या भावनांबरोबर खेळण्याचा हा प्रकार आहे. ज्यांनी माझ्यासाठी काळजी व्यक्त केली, प्रार्थना केल्या, त्यांचा मी आभारी आहे, असे श्रेयसने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते. अभिनेत्याला याआधी हार्ट अटॅकचा सामना करावा लागला होता.
नीना कुळकर्णी यांच्या कामाबाबत बोलायचे, तर त्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांच्याबरोबर अनुपम खेर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आहेत. याबरोबरच, स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत अभिनय करताना दिसत आहे. नीना कुळकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असतात.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णींना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.