Neha Pendse on Eggs Freezing: नेहा पेंडसे नुकतीच ‘तिघी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर व सोनाली कुलकर्णीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ६ मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे कौतुक होताना दिसत आहे. गश्मीर महाजनी, साजिरी जोशी अशा कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

नेहा अभिनयाबरोबरच निर्माती म्हणूनही काम करते. नेहा गेल्या काही दिवसांपासून ‘तिघी’ सिनेमानिमित्त विविध मुलाखती देत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने आई व्हायचे नाही, असे वक्तव्य केले होते.

“खूप लहानपणापासून काम करत असल्यामुळे एक जबाबदारीची जाणीव….”

आता अभिनेत्रीने आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत, बीजांड गोठवण्यामागे (Eggs Freezing) काय विचार होता यावर तिने वक्तव्य केले. नेहा म्हणाली, “अगदी खरं सांगायचं तर खूप लहानपणापासून काम करत असल्यामुळे एक जबाबदारीची जाणीव नेहमीच होती. तसेच, त्यामुळे येणारा तणावही असायचा. लग्न करेपर्यंत मला मूल नकोय यावर मी ठाम होते, कारण मला स्वत:साठी जगण्याची संधी मिळालीच नव्हती, कारण मी सतत कामच करत होते. मला स्वत:चा वेळ (फ्री स्पेस) कधीच मिळाला नाही.”

पुढे ती म्हणाली, “आमचं लग्न झाल्यानंतर कोविड आला होता, त्यात सगळ्यांचीच दोन वर्षे गेली. त्या काळात मला स्वत:चा खूप विचार करता आला. माझी व्यावसायिकरित्या खूप प्रगती झाली, पण माझी वैयक्तिक विकास, प्रगती खूप कमी झाली. जेव्हा तुम्ही स्वत:बरोबर खूप वेळ बसता तेव्हा तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, याबद्दल अधिक स्पष्टता यायला लागते. मात्र, अशा प्रश्नांची उत्तरे नेहमीच वेगळी असतात.”

“विशीमध्ये तुम्ही वेगळे असता. मला वाटतं दरवर्षी तुमच्यात समज, नैतिकता, मूल्ये वाढत जातात; तर जेव्हा मी स्वत:बरोबर बसले तेव्हा मला असं वाटलं की, मला आयुष्यभर हेच करायचं आहे का? मग मी कोण आहे, काय आहे असे प्रश्न पडले. तेव्हा माझ्या मनात बीजांड गोठवण्याबाबत विचार आला, पण मला भविष्यात जाऊन आई व्हायचं आहे, यावर मी ठाम नव्हते.”

त्याचे कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, “मला आता आई व्हायचं आहे, माझं हेही होत नाही, कारण माझं असं झालं की पुन्हा जबाबदारी, पुन्हा कशात तरी अडकू असे वाटते. मी अशी नाही की आईसुद्धा होऊया आणि कामही करूयात. माझ्यामध्ये तेवढी चिकाटी नाही. मला माहीत आहे की जर मी मुलाला जन्म दिला तर माझं सगळं आयुष्य त्याच्या अवतीभोवती असेल, कारण माझी आई तशी आहे.”

“माझ्या आईला तशा भूमिकेत पाहत असल्यामुळे माझी मतंही तशीच आहेत, कारण माझ्याबरोबर नेहमीच आई असल्यामुळे मला माहीत आहे की त्या संरक्षणामुळे मी आज वेगळी झाली आहे, तर मला ते माझ्या मुलाला द्यायला आवडेल. मग मी विचार केला की मला असं करायचं आहे का? कदाचित नाही. जबाबदारी हवी आहे का? तर कदाचित नाही. तर मग आपण बीजांड गोठवूया.अगदी वाटलंच कधी की आपल्याला आता आई बनायचं आहे आणि जैविकदृष्ट्या गोष्टी माझ्या बाजूने नाहीत असं व्हायला नको, म्हणून मी बीजांड गोठवून ठेवले. पण, माझं मत अजूनही तेच आहे.”