Neha Pendse On Relationship with Sister: ‘तिघी’ हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. अनेक कलाकार याबद्दल बोलत आहेत, सोशल मीडियावर लिहित आहे. या सिनेमात ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली आहे, त्याची चर्चा होताना दिसत आहे.
‘तिघी’ या सिनेमात सोनाली कुलकर्णी, भारती आचरेकर व नेहा पेंडसे प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा पेंडसेने या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. सिनेमाबरोबरच नेहा पेंडसे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. विविध मुलाखतींमधील तिची वक्तव्ये सध्या मोठ्या चर्चेत आहेत. तिने तिच्या करिअरमधील अनेक किस्से सांगितले. तसेच, लग्नानंतर काय बदललं, आई होण्याबद्दल तिला काय वाटतं अशा अनेक गोष्टींबद्दल तिने विविध मुलाखतीत वक्तव्ये केले आहे.
आता तिने ‘आरपारला’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मोठ्या बहिणीबरोबर गेली अनेक वर्षे अबोला होता, असे वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
“मी तिला कधी समजून घेणार?”
‘तिघी’ सिनेमामध्ये दोन बहिणींची गोष्ट पाहायला मिळते. तुझं आणि तुझ्या बहिणीचं नातं कसं आहे? यावर नेहा पेंडसे म्हणाली, “तिघीमध्ये मी मोठी आहे. पण, माझ्या खऱ्या आयुष्यात मी लहान आहे, माझी बहीण मोठी आहे. तिघीमध्ये जसे नातेसंबंध आहेत आणि माझे खऱ्या आयुष्यात जसे नातेसंबंध आहेत, त्याचा काही संबंध नाही. पण मजेची गोष्ट अशी आहे की तिघीमध्ये माझं पात्र मोठ्या बहिणीचं असल्यामुळे मला मोठी बहीण असणं म्हणजे काय? हे मला नव्याने सगळं शोधावं लागलं. कारण-मी माझ्या घरात लहान असल्यामुळे आणि इंडस्टीमध्ये काम करत असल्याने घरच्यांचं सगळं लक्ष माझ्यावर होतं. आई सतत माझ्याबरोबर असायची.”
नेहा पुढे म्हणाली, “माझी बहीण माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आणि मी पंधरा-सोळा वर्षांची असल्या आधीपासून माझी आई माझ्याबरोबर शूटिंगला असायची. माझ्या बहिणीचा स्वभाव माझ्यापेक्षा वेगळा आहे. ती बिनधास्त होती. मला वाटायचं की तिला मोकळीक मिळतेय, आई माझ्याबरोबर असते, मला काम करावं लागतं.आईचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं असं नाही. पण, ती सतत माझ्याबरोबर असल्याने माझ्या बहिणीला काहीतरी त्रास झाला असेलच. याचा शोध मी तिघीच्या शूटिंगनंतर घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून माझा व माझ्या बहिणीचा बऱ्यापैकी अबोला आहे. कारण-आम्ही दोघी फार वेगळ्या आहोत. आमची व्यक्तीमत्व, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे.”
ती पुढे म्हणाली, “तिघी सिनेमानंतर मी माझ्या बहिणीला बोलले. तिच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला तर आरोप वगैरे असं सुरू होतं.”
दोघींकडून असं झालं का? यावर नेहा म्हणाली, “नाही. यंदा मी एक शहाणपणा केला. मी फक्त ऐकत होते. कारण- मी विचार केला की मी तिला कधी समजून घेणार? मी लहानपणापासून काम करत असल्याने घरात मला महत्व दिलं गेलं. माझ्या मताला किंमत होती. पण आपल्या नात्यांना कसं जपायचं, हे मी खूप उशीरा शिकले. तर आता जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली तेव्हा मी तिचं खूप ऐकून घेतलं. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर किंवा योग्य होत्या, असे नाही. पण, मी तिची बाजू ऐकून घेतली.”
“आज सहा महिने झाले आहेत. आजही आम्हाला एकमेकींचं पटत नाही किंवा तिला भूतकाळात माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या सगळ्याच बरोबर होत्या, असे नाही. काही योग्य होत्या, ज्या मी करू शकले नाही. त्याची किमान मी जबाबदारी घेतली. मला वाटतं की मला तेव्हा मला त्या गोष्टी कळल्या नाहीत. मला मान्य आहे की माझं वय गोष्टी समजून घेण्याचं नव्हतं.पण, जरा शांतपणे बसून मी तिचा विचार केला असता, तर काही गोष्टी मी तिच्याकरता वेगळ्या पद्धतीने करू शकले असते”, असे म्हणत अभिनेत्रीने बहिणीबरोबर पुन्हा बोलायला सुरुवात केल्याचे सांगितले.
