मराठी प्रेक्षकांची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून नेहा पेंडसेला ओळखलं जातं. साधारण २०१० मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पुढे अल्पावधीतच या मालिकेने सर्वांच्या मनात घर केलं. नेहाने आजवर मराठीसह हिंदी कलाविश्वात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बालवयापासून ती या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. वयाच्या अवघ्या १६ वर्षी तिने ‘देवदास’मध्ये शाहरुख खान, माधुरी दीक्षितसह स्क्रीन शेअर केलेली आहे. नेहा पेंडसेच्या फिल्मी करिअरबद्दल चर्चा करण्यासह खूप काही आहे…तिचं कौतुक करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चा कशाची होतेय, तर तिला आई व्हायचं नाहीये!

खरंतर, आजच्या काळात इतके स्पष्ट विचार असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नेहाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचे मातृत्त्वाबद्दलचे विचार मांडले. तिच्या लग्नाला सहा वर्षे झालेली आहेत..आणि आता आई व्हायचं नाहीये, असं तिने यावेळी सांगितलं. अर्थात, एक क्षण असा होता…जेव्हा नेहाला मनापासून आई व्हायचं होतं पण, तेव्हा ती आई होऊ शकली नाही. त्यामुळे तिने Eggs Freeze करण्याचा निर्णय घेतला होता. ती नेमकं काय बोलली होती ते सुरुवातीला पाहुयात…

नेहा याबद्दल राजश्री मराठीच्या मुलाखतीत म्हणाली होती, “मला सुरुवातीला आई व्हायचं होतं…पण तेव्हा मी आई होऊ शकले नाही…खूप निराश झाले. इतकी वैतागले की ‘नाही, आता मला आई नाही व्हायचंय’ असं मी म्हणायला लागले. यादरम्यान Eggs Freeze करण्याचा निर्णय घेतला. कारण, भविष्यात बाळाचा विचार करू असं मला वाटलं होतं. पण, आता मला आई व्हायचं नाहीये. आज मी इतकं मोकळेपणाने बोलतेय कारण, मला माहितीये माझ्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या परिस्थितीतून जात असतील”

नेहाचं हे वक्तव्य सर्वत्र व्हायरल झाल्यावर सुरू झालं ट्रोलिंग…मुळात आई व्हायचं किंवा नाही हा नेहाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यातही एक क्षण असा होता जेव्हा तिला खरंच आई व्हायचं होतं आणि ते शक्य झालेलं नाहीये. त्यावेळी तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे कदाचित कोणीच समजू शकणार नाही. गर्भाशय तिचं, सहन केलंय तिने, निर्णय तिचा मग यापासून इतरांना का त्रास व्हावा? अशातही नेहाला ट्रोल करणारे केवळ पुरुष नव्हते…त्यात महिलांचाही समावेश आहे.

“तू स्त्री आहेस…निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जातेस…” अशा सगळ्या कमेंट्स नेहाच्या व्हिडीओवर आल्या होत्या. एकीकडे स्त्रियांनी ठामपणे मत मांडावं असं सांगणारा आपला समाज…एका स्पष्ट मत मांडणाऱ्या अभिनेत्रीला उघडपणे ट्रोल करतोय, वाईट भाषेत तिच्यावर टीका करतोय हे कितपत योग्य आहे. अनेकांनी चुकीच्या गोष्टी प्रमोट करू नकोस असंही तिला म्हटलंय. पण, नेहाने कुठेही तिचं वैयक्तिक मत कोणावरही लादलं नाहीये. त्यामुळे तिच्या प्रायव्हसीचा आदर करणं हे आपलं काम आहे.

आता ट्रोलर्सना जाब विचारल्यावर अनेकांचं असं म्हणणं असतं. मग तिने सोशल मीडियावर या गोष्टी का बोलायच्या? जर, ट्रोलर्सना सोशल मीडियावर शिव्या देणं गैर वाटत नाही तर, नेहाने स्वत:चं मत का मांडू नये?

बरं, मातृत्वावरून ट्रोल होणारी नेहा पेंडसे ही पहिली अभिनेत्री नाहीये. यापूर्वी अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट अशा अनेक अभिनेत्रींना यावरून बोललं गेलंय. काही जणींनी PCOD सारख्या समस्यांमुळे आई न होण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही माहीत नसताना तिला बोल लावणं हे चुकीचं आहे. कारण, तिला आई व्हायचं नाहीये, गर्भाशय तिचं आहे मग ट्रोल करणारे तुम्ही कोण?