मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसेकडे पाहिलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा तिच्या ‘तिघी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त नेहाने अलीकडे अनेक मुलाखतींना सुद्धा उपस्थिती लावली होती. यादरम्यान नेहाने तिने वयाच्या अवघ्या १६ वर्षी सुपरस्टार शाहरुख खानबरोबर काम केल्याचं सांगितलं.
नेहाला कमी वयातच शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा ही मराठमोळी अभिनेत्री दहावीत होती. दहावीचा अभ्यास सांभाळून तिने ‘देवदास’मध्ये काम केलं होतं. यावेळेचा अनुभव नेहा पेंडसेने ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
नेहा पेंडसे म्हणाली, “मला अजूनही देवदासच्या सगळ्या आठवणी आठवतात. माझ्या भूमिकेचं नाव होतं चौरंगी…ती चंद्रमुखीच्या मैत्रिणींपैकी एक असते. त्या चित्रपटाचा सेट इतका भव्य आणि मोठा होता…कधी-कधी सेटची संपूर्ण लाईटिंग करायला तीन ते चार तास लागायचे. देवदासचं शूट सुरू होतं तेव्हा मी दहावीत होते. मी अवघ्या १६ वर्षांची होते. चंद्रमुखी, कोठा…हे सगळं शूटिंग होतं ते सगळं रात्रीचं असायचं. त्यामुळे दिवसा शूटिंग, दहावीचा अभ्यास आणि कधी-कधी रात्रीचं सुद्धा शूटिंग असायचं असं सगळं जुळवून मी काम करत होते.”
शाहरुख खानबद्दल…
“शाहरुख खान मला नेहमीच आवडायचा…तेव्हा सुद्धा आणि आजही मला तो खूप आवडतो. मला आता आठवलं की असं वाटतं…’अरे नेहा तेव्हा तू का नाही त्याच्याशी जास्त बोललीस’ माझ्यासारख्या लहान मुलीला सुद्धा त्या माणसाने ( शाहरुख ) खूप छान, स्पेशल वागणूक दिली होती. एका माणसात इतकी ताकद कुठून येते? सेटवर कायम तो सर्वांशी प्रेमाने वागायचा. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी…अतिशय छान माणूस, क्रिएटिव्ह माणूस. ‘देवदास’चा स्केल पूर्णपणे वेगळा होता. मी इतकं भव्य शूट आजवर कधीही केलं नव्हतं.” असा अनुभव सांगत नेहाने किंग खानचं भरभरून कौतुक केलं.
दरम्यान, नेहा पेंडसेच्या तिघी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये नेहासह ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ६ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहेत.
