Nilu Phule Biopic update by daughter Gargi Phule : बोलण्याची विशेष लकब, भारदस्त आवाज, अनोखी अभिनय शैली यामुळे मराठी सिनेसृष्टीत निळू फुले यांचं नाव अजरामर ठरलं. त्यांनी सिनेमांमध्ये साकारलेला नायक असो वा खलनायक; त्यांच्या सदाबहार भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. असंख्य गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे. पण त्यांच्या या भूमिकांऐवजी फक्त ‘बाई वाड्यावर या…’ हे वाक्य जास्त प्रचलित झालं. पण, हे वाक्य म्हणजे निळू फुलेंची खरी ओळख नव्हे. याबाबत त्यांची मुलगी गार्गी फुले यांनी खुलासा केला आहे.
गार्गी फुले ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मुळात मी कायमच सांगत आलेय की, बाबाच्या कोणत्याच चित्रपटात तो ‘बाई वाड्यावर या’ असं म्हणालेला नाहीये. मला हे ज्याने त्याने शोधून दाखवावं. बरं ही एवढीच त्याची इमेज नाहीये. ‘बाई वाड्यावर या’ या वाक्यातच तुम्हाला त्यामागची भावना कळते. मग, तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगताय? फक्त ‘बाई वाड्यावर या’ ही त्यांची प्रतिमा नव्हती. बाबांची ही इमेज पुसण्यासाठीच मी बायोपिकचा अट्टाहास केलाय.”
त्या पुढे म्हणाल्या, “ज्या दिवशी माझ्याकडे प्रसाद ओक आला की, गार्गी आपण निळू भाऊंवर बायोपिक करुयात का? तेव्हा मी थोडीशी मागे सरकले. कारण, बाबाने स्वत:चं आत्मचरित्र सुद्धा लिहिलं नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की, मी आत्मचरित्र लिहिलं तर मी खरं लिहेन आणि मी जर खरं लिहिलं तर अर्धी इंडस्ट्री बरबाद होईल. हे सगळं त्याला कधीच मान्य नव्हतं आणि म्हणूनच त्याने आत्मचरित्र कधीच लिहिलं नव्हतं.
“मग, आता बायोपिकच्या माध्यमातून बाबाची कोणती बाजू प्रेक्षकांसमोर यावी आणि प्रेक्षकांनी बाबाला कोणत्या दृष्टीने पाहावं यासाठी मी, किरण यज्ञोपवीत आणि प्रसादने स्वत: खूप मेहनत घेतलीये. या बायोपिकमागे हाच अट्टाहास आहे की, पुढच्या पिढीला समजावं की, निळू फुले म्हणजे ‘बाई वाड्यावर या’ एवढंच नाहीये. यापलीकडे त्या व्यक्तीकडे बघा…त्याचं आयुष्य कसं होतं हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.”
“बाई वाड्यावर या’ याच्या परे तो माणूस आहे…हे सगळं दाखवण्यासाठीच बायोपिकचा अट्टाहास केला बाकी काहीच नाही. या सिनेमाच्या लिखाणासाठी तीन वर्षे लागली. आधी जी कंपनी हा सिनेमा निर्मित करणार होती…त्यांना आता हा मराठी सिनेमा करायचा नाहीये. म्हणून त्यांनी हा चित्रपट आम्हाला परत दिलाय. त्यामुळे आता आम्ही नव्या निर्मात्याच्या शोधात आहोत. प्रसाद, किरण…यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना जी मदत लागेल ती मी करतेय. पुढच्या दोन वर्षांत हा सिनेमा प्रदर्शित होईल अशी मला आशा आहे.” असं गार्गी फुलेंनी सांगितलं.
