‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत पोहोचले. यापैकी एक अभिनेता म्हणजे निमिष कुलकर्णी. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत निमिषने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निमिष ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या मराठी नाटकानंतर ‘अग्नि’ या हिंदी चित्रपटामध्ये झळकला. मराठी नाटक आणि हिंदी चित्रपटानंतर आता निमिष ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करणार आहे. येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
निमिष या सिनेमात आदित्य (आदि) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू असलेला आदित्य कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा आहे. आदित्य हा श्रावणीचा आत्येभाऊ. बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि अनेक सुंदर आठवणींची घट्ट वीण आहे. तो इतरांप्रमाणे जास्त बोलत नाही; पण प्रत्येकाच्या मनातील न बोललेले भाव अचूक ओळखण्याची त्याच्यात विलक्षण संवेदनशीलता आहे. कधी कधी सर्वात मोठा आधार हा मोठ्या शब्दांत नव्हे, तर शांतपणे आपल्या माणसांना आधार देण्यात असतो, याची जाणीव आदित्य आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वातून करून देतो.
या चित्रपटाबाबत निमिष कुलकर्णी म्हणतो, “द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात दडलेल्या भावनांचा प्रवास आहे. या चित्रपटात माझी भूमिका साकारताना अनेक भावनिक पैलू अनुभवायला मिळाले. निलेश नाईक सरांची संवेदनशील मांडणी आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी माझ्यावर आतापर्यंत भरभरून प्रेम केलं आहे. ‘द्विधा’मधील माझी ही भूमिका देखील त्यांना नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.”
‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटात बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार पद्धतीने उलगडण्यात आला आहे.
या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचं असून, या सिनेमाच्या निर्मात्या विदुला रमेश आजगावकर आहेत. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार,आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
