Nirmiti Sawant on Payments: निर्मिती सावंत नुकत्याच ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांच्याबरोबर या चित्रपटात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत दिसली. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाबरोबरच निर्मिती सावंत नाटकाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या लाडकी विहीण योजना या नाटकातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये स्नेहा रायकरदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. आता या सगळ्यात त्यांच्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी निर्मिती सावंत यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मानधनाबद्दल वक्तव्य केले. एखादा प्रोजेक्ट निवडताना त्यामागे काय विचार असतो, असे त्यांना विचारले. त्यावर निर्मिती सावंत म्हणाल्या, “एक अशी कुठली गोष्ट नसते. पाच-सहा गोष्टी असतात. ज्या बघितल्यानंतर मला असं वाटतं की वाटेल ते होऊ दे, मला ही भूमिका करायची आहे.”

“…त्यामुळे खूप त्रास व्हायचा”

पुढे त्या म्हणाल्या, “एक म्हणजे मी प्रॉडक्शन हाऊस बघते. जे एवढी मेहनत करून केलेलं काम असतं, ते लोकांपर्यंत पोहोचवणारं प्रॉडक्शन हाऊस आहे का, ते मी बघते. कारण-सुरुवातीच्या काळात माझ्याही बाबतीत हे झालं आहे की लोकांपर्यंत काम पोहोचायचे नाही. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. मी खूप काम करत नाही. त्यामुळे जितकं करते, त्यावर जीव लावून करते. भूमिका कोणती आहे ते बघते. जरी भूमिका छोटी असली ती तरी स्क्रीप्टचा मतितार्थ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी असेल तरी मी करते. त्याचं आताचं उदाहरण म्हणजे, हेमंत ढोमेचं क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम आणि क्षितिज पटवर्धनचं उत्तर या सिनेमातील माझ्या भूमिका आहेत.”

निर्मिती सावंत पुढे म्हणाल्या, “एखादी भूमिका निवडताना पैसेदेखील बघते. माझं हेच म्हणणं आहे की आपण उगाचंच स्वत:ची किंमत कमी करतो. त्यामुळे मी माझी किंमत कमी करत नाही. मी पैसे व्यवस्थित घेते. त्याबद्दल इंडस्ट्रीत चर्चा असेल.पण, मला काही फरक पडत नाही. मी पैसे घेते. कारण- ते काम खूप महत्वाचं असतं. बाकी सगळं सोडून मी तिथे माझं तन मन धन लावलेलं असतं. सगळ्याचं सोंग आणता येईल, पण पैशाचं सोंग कधीच आणता येणार नाही.”

फक्त एखाद्या प्रोजेक्टमधून पैसे मिळतात, म्हणून कधी काम केलं आहे का? यावर निर्मिती सावंत म्हणाल्या की, कधीच असं काम केलं नाही. मला माझी मेकअप आर्टिस्ट कित्येक वर्षे सांगायची की पैसे मिळत असतील तर काम करा. पण, भूमिका, स्क्रीप्ट चांगली नसेल तर मी काम करत नाही. कारण- पैसे मिळतात म्हणून मी काम करणार आणि मला आयुष्यभर वाईट वाटत राहणार. आधी वाटायचं पैसे मिळत असेल तर करूयात का काम? पण तसं कधी केलं नाही. असे म्हणत निर्मिती सावंत यांनी उत्तम व दर्जेदार भूमिका आणि स्क्रीप्ट निवडण्यावर भर असल्याचे सांगितले.