Ashok & Nivedita Saraf Son Aniket Saraf : मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ व त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकतीच कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावली. संपूर्ण मराठी कलाविश्वासाठी हा अभिमानाचा क्षण होता. गेली अनेक दशकं अशोक व निवेदिता सराफ यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या मराठी भाषेचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी या एव्हरग्रीन जोडीने यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावली.
निवेदिता व अशोक सराफ यांच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि कोकणातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर सुद्धा कान्समध्ये उपस्थित होती. यासह अभिजात मराठी OTT चे संस्थापक केदार जोशी सुद्धा या सोहळ्याला गेले होते.
फ्रान्सला केल्यावर निवेदिता व अशोक सराफ यांना एक खास व्यक्ती भेटायला आली होती…तो म्हणजे त्यांचा एकुलता एक चिरंजीव अनिकेत सराफ. त्याने कान्स सोहळ्यातील आई-बाबांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय अनिकेतने आपल्या लाडक्या आई-बाबांसह खास फोटोशूट सुद्धा केलं आहे. या तिघांचा फॅमिली फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
अनिकेतने आई निवेदिता सराफ यांचा गोड फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर त्याने ‘Soo Pretty’ असं कॅप्शन दिलं आहे. लेकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये निवेदिता सराफ यांचा कान्स रेड कार्पेट लूक नेमका कसा होता याची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. पिस्ता कलरची पैठणी साडी, त्यावर पारंपरिक मराठी दागिने- मंगळसूत्र, केसात गजरा, हातात बांगड्या, नथ आणि हातात लहानशी साडीला कॉन्ट्रास मॅचिंग होईल अशी गुलाबी रंगाची पर्स या लूकमध्ये निवेदिता खूपच सुंदर अन् रॉयल दिसत आहेत.
अशोक व निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ परदेशात असतो. त्याने करिअर करण्यासाठी अभिनय क्षेत्रापेक्षा एक वेगळी वाट निवडली. अनिकेत हा शेफ आहे. आई निवेदिता यांच्यामुळे त्याला लहानपणापासून स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. अनिकेतने त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये पूर्ण केलं आहे. तो भारतीय तसेच पाश्चिमात्त्य पदार्थ सुद्धा बनवतो. निक सराफ या नावाने तो सोशल मीडियावर सक्रिय आहे.

दरम्यान, या भव्य कान्स सोहळ्याला यंदा पुष्कर जोग सुद्धा उपस्थित राहिला होता. या कार्यक्रमाची सांगता २३ मे रोजी होणार आहे. सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून अशोक व निवेदिता सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
