Ashok Saraf Birthday : मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलं असे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७९वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशोक सराफांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्याविषयी पोस्ट लिहित, काही आठवणी सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडूनदेखील अशोक सराफांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच अशोक सराफांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही सोशल मीडियावर अशोक सराफांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांना ७९ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निवेदिता सराफ यांची पोस्ट

अशोक, आज तू ७९ व्या वर्षात पदार्पण करतोयस यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही! Age Is Just A Number and You Have Proved That… तुझी तुझ्या कामाप्रती असलेली निष्ठा, शिस्त आणि Self Control यासाठी शतशः प्रणाम… तू एक आदर्श मुलगा, प्रेमळ पिता, उत्तम पती आणि जिवलग मित्र आहेस. Happy Birthday Darling!

अशोक सराफ यांना कायमच पत्नी निवेदिता सराफ यांची खंबीर साथ लाभली आहे. आजवरच्या प्रत्येक मानाच्या पुरस्काराचं श्रेय अशोक सराफांनी चाहत्यांना अन् त्यांच्या कुटुंबीयांना दिलं आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, अशोक सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतेच ते कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थित राहिले होते. मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अशोक व निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ही कलाकार मंडळी कान्सला गेली होती. आता लवकरच ते संकर्षण कऱ्हाडेसह एका सिनेमात झळकणार आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकर्षणने पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.