‘अफरातफरी’ या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अभिनेता ओंकार भोजनेवर गंभीर आरोप केले होते. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकार फोन उचलत नाही, प्रमोशनला येत नाही, EP ला गंडवतो, तो अनप्रोफेशनल…सराईत खोटारडा आहे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल सांगितल्या. याशिवाय पुन्हा कधी ओंकारबरोबर काम करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दिग्दर्शकांनी भर मुलाखतीत नाव घेऊन ओंकारबाबत थेट असं वक्तव्य केल्याने त्याच्या सर्वच चाहत्यांना धक्का बसला होता.

लवकरच याबाबत सविस्तर बाजू मांडेन, असंही यादरम्यान ओंकारने सांगितलं होतं. आता नुकत्याच ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या पॉडकास्टमध्ये ओंकार भोजनेने सविस्तरपणे आपली बाजू मांडली आहे. तसेच सोशल मीडिया प्रमोशनल स्ट्रॅटेजी सुरुवातीच्या करारात सांगाव्यात असंही ओंकार म्हणाला.

ओंकार भोजनेने सविस्तरपणे मांडली बाजू

ओंकार म्हणाला, “मला जुलैमध्ये सांगितलं गेलं की, हा सिनेमा ३ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. तर, पहिल्यापासून मी त्या इपींच्या संपर्कात आहे…असं नाहीये की मी संपर्कात नाही. आता दुसऱ्या एखाद्या रिडिंगमध्ये किंवा शूटिंगमध्ये जर मी असेन, तर मी माझा फोन घेऊ शकत नाही. अशावेळी मग मी फोन फ्लाइट मोडवर ठेवतो किंवा माझा फोन बंदच असतो. अर्थात आपल्या फोनवर यादरम्यान येऊन गेलेले कॉल आपल्याला कळतात…मग, काम संपलं की, मी नंतर सर्वांना कॉलबॅक करतो. त्यामुळे मी त्या ईपींच्या संपर्कात आजही व्यवस्थित आहे, आता दिग्दर्शकांनी असं का म्हटलं मला माहिती नाही. हे सविस्तरपणे सांगायचं झालं तर, सोमवारी ( २१ सप्टेंबर ) आम्हाला पुण्यात सिनेमांच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. आता मी टेलिव्हिजनवर सुद्धा काम करतोय, त्यामुळे तिथे मला आधी कळवावं लागतं की, आपण आहोत की नाही…त्यानुसार मग स्किट बसवले जातात. तर, त्यांनाही मी सोमवारी व्यग्र आहे असं कळवलं. आता हे सगळे इंटरव्ह्यू सकाळी होणार होते..त्यामुळे रात्री मी पुण्यातल्या एका डबिंगचं नियोजन केल होतं. जेणेकरून सकाळी इंटरव्ह्यू झाले की, मी नंतर मी रात्री डबिंग पूर्ण करेन.”

…म्हणून ट्रेलर लॉन्चला उपस्थित नव्हता ओंकार भोजने

“आता सोमवारचं हे सगळं नियोजन झालेलं असताना मला शनिवारी संध्याकाळी मेसेज येतो की, सोमवारचं आपलं कॅन्सल झालंय. खरंतर, २१ सप्टेंबरला या ट्रेलरचा पहिला इव्हेंट नियोजित केला होता…त्यानंतर मग यांची २२ सप्टेंबर तारीख ठरली. अर्थात २२ तारखेला मला उपस्थित राहता आलं नाही. मी त्यांना कल्पना सुद्धा दिली की, मी पुण्यात आहे आता…मुंबईत असतो तर कसंही मॅनेज केलं असतं. कारण, ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम २२ तारखेला मुंबईत होता. याशिवाय आधी जी २१ तारीख ठरली होती तेव्हा मी वेळ दिलेलाच होता ना… त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी मग उपस्थित राहणं शक्य झालं नाही. या सिनेमाचं शूटिंग दोन-अडीच वर्षे आधी झालेलं आहे…हा चित्रपट रिलीज आता होतोय. पण, आता माझ्या नव्या कामाच्या कमिंटमेंट्स पाळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यात मी यांचं नियोजन ऐनवेळी बदललं, त्यामुळे मला शक्य झालं नाही.”

मी सोशल मीडियावर सुद्धा नाहीये, पीआरचे नवीन फंडे पटत नाहीत

“आता दिग्दर्शक अजून एक मुद्दा बोलले की, सेल्फी व्हिडीओ करून दिला नाही. तर, सॉरी सर माझं अभिनेता म्हणून जे काही काम होतं सिनेमातलं ते मी प्रामाणिकपणे केलंय. पण, हे पीआरचे नवीन फंडे आहेत की, या अँगलने व्हिडीओ कर…त्या अँगलने कर ते मला स्वत:हून पटत नाहीत. आता मी सोशल मीडियावर सुद्धा नाहीये…त्यामुळे माझ्याकडे ते स्किल नाहीये असंही तुम्ही म्हणू शकता. पण, या व्यतिरिक्त प्रमोशनचे जे मुख्य टप्पे असतात… ट्रेलर, इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट त्याला मी जातो. नेहमी अग्रीमेंटच्या गोष्टी बोलल्या जातात…त्यामुळे सिनेमाच्या सुरुवातीच्या प्रोसेसमध्येच जर पीआरची स्ट्रॅटेजी आधीच समजली तर, आपण किती प्रमाणात या प्रमोशनच्या गोष्टी करू शकतो हे आपण सांगूच शकतो.”

हळुहळू मी या सगळ्याचा प्रयत्न करेन

“यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं…अर्थात काही गोष्टींमध्ये यापूर्वी माझे वादही झाले आहेत…पण, समोरच्या टीमने मला समजून घेतलं. माझ्या कामांना यामुळे कुठेही धक्का बसला नव्हता. मला वाटतं करारात हे प्रमोशनचे सगळे नियम देखील नमूद असले पाहिजेत. कारण, अनेकदा काय होतं आपण १० दिवस शूटिंग करणार, म्हणजे भूमिका कमी पण, प्रमोशनसाठी १५ दिवस फिरावं लागतं. आता सोशल मीडियाबद्दल सांगायचं झालं तर, मला या सगळ्याची अजिबात क्रेझ नाहीये. फोन बंद असला की, मी व्यवस्थित माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकतो असं मला वाटतं. मी कुटुंबात आणि जवळच्या मित्रमंडळींमध्ये रमणारा आहे आणि तेव्हा सुद्धा मी फोन बघत नाही. आता माझी टीम आहे तर, बऱ्याच गोष्टी मलाही ते लोक सांगतात आता हळुहळू मी या सगळ्याचा प्रयत्न करेन.” असं ओंकारने या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ओंकार भोजने पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. सोशल मीडिया, इंटरव्ह्यू, इनस्टाग्राम या सगळ्यापासून तो नेहमीच काहीसा अलिप्त असतो. तरीही अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ओंकार भोजने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.