रील्सवर धुमाकूळ घालणारी आणि सर्वांना खळखळून हसवणारी ‘Ourange Juice गँग’ आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच या नव्या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘भूतम भयम्’! येत्या २४ जुलैला हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भय आणि हास्याचं जबरदस्त मिश्रण असलेल्या या चित्रपटात सोशल मीडियावरचे स्टार क्रिएटर्स एकत्र झळकणार आहेत. ज्यांनी आपल्या भन्नाट रील्समधून, कॉमिक टायमिंग साधत आणि मजेशीर कंटेंटमुळे आधीच लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. ‘भूतम भयम्’ या चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम एका हटके आणि धम्माल अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाच्या नावातच रहस्य, मजा आणि थोडासा गोंधळ दडलेला असताना, या हॉरर-कॉमेडीमागची नेमकी कथा काय आहे? हे सगळे कोणत्या भानगडीत अडकणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर या सिनेमाबद्दल सांगतात, ”हा चित्रपट मराठीतील नव्या दमाच्या फळीने मांडलेला युथफुल विचार आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिला चित्रपट. प्रेक्षकांना विलक्षण थिएटरीकल अनुभव देण्यासाठी ‘भूतम भयम्’ची टीम २ वर्षांपासून मेहनत घेतेय. सात बेरोजगार मित्रांची ही गोष्ट हॉरर कॉमेडीच्या एका अद्भुत जगात प्रेक्षकांना घेऊन जाईल. दंतकथेचं हे जग मराठीत पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.”

निर्माते नरेन कुमार म्हणतात, ”निर्माता म्हणून हिंदीत ‘जॅाली.एल्.एल्.बी’ सारखा चित्रपट केल्यानंतर मराठीत काहीतरी वेगळं, विलक्षण करायचं हा विचार नेहमीच होता. ‘भूतम भयम्’ हा तो भव्य अनुभव आहे असं मी म्हणेन. दृश्यसंकल्पना हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी लागणारं सगळं तांत्रिक, कलात्मक पाठबळ निर्माता म्हणून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय! या जोडीला आम्हाला झी स्टुडिओजची प्रस्तुतकर्ता म्हणून लाभलेली साथ ही नक्कीच मोलाची आहे. ‘भूतम भयम्’ हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर सिनेमा ठरेल यात शंका नाही.”

या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांभाळली आहे. ‘Ourange Juice गँग’ हा ‘भूतम भयम्’ सिनेमा येत्या २४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.