Gondhal Marathi Movie Oscar Entry Theatrical Release : मरराठी चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्करला गेल्यापासून तो कुठे पाहायचा? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. कारण हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध नाही. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर तो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. होय. ‘गोंधळ’ मोठ्या पडद्यावर रिलीज होतोय. ९९ व्या अकादमी अवॉर्ड्ससाठी भारताने ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ श्रेणीसाठी अधिकृत एंट्री म्हणून पाठवलेला ‘गोंधळ’ १३ नोव्हेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने १८ सप्टेंबर रोजी ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून निवड केली. तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर गोंधळची चर्चा होत आहे. संतोष डावखर या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. ‘गोंधळ’ हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. महाराष्ट्राच्या लोककथा आणि परंपरांवर आधारित असलेला हा चित्रपट ग्रामीण जीवन, एका बिघडलेल्या नात्याची गोष्ट आणि एका रात्रीत समोर येणारी रहस्ये या गोष्टींवर आधारित थरारपट आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर ‘गोंधळ’च्या रिलीजबद्दल म्हणाले…
संतोष डावखर म्हणाले, “जेव्हा आम्ही ‘गोंधळ’ बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा आमचे एकमेव ध्येय आमच्या मातीतील अस्सल संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे हे होते. या लोककथेवर आधारित थ्रिलर चित्रपटाला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की तो भारताची अधिकृत एंट्री म्हणून ऑस्करला पाठवण्यात आला, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. आता १३ नोव्हेंबर रोजी पॅन-इंडिया रिलीजच्या माध्यमातून हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच आमची कथा एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा लोकांपर्यंत पोहोचतेय.”
गोंधळ चित्रपटाचा ट्रेलर
चित्रपट वेगवेगळ्या भाषांमधील आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “जेव्हा भावना खरी आणि प्रामाणिक असते, तेव्हा चित्रपटाला भाषेची सीमा नसते. भारतातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना हा उत्कंठावर्धक प्रवास एकाच वेळी मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे, याचा मला आनंद आहे.”
‘गोंधळ’ चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके या कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
