Priyadarshini Indalkar-Payal Jadhav upcoming Movie: २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबीर गुलाल’ मालिकेतून अभिनेत्री पायल जाधवला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. मालिकेत तिच्याबरोबर अक्षय केळकर, शुभांगी लाटकर, गायत्री दातार हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते.
‘अबीर गुलाल’बरोबरच पायल ‘मानवत मर्डर्स’मध्येही दिसली होती. जुई, थ्री ऑफ अस (Three Of Us), बाप ल्योक अशा सिनेमांमध्येही ती दिसली होती. काही दिवसांपूर्वी पायल तारिणी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिने साकारलेल्या रेवा या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.
प्रियदर्शिनी इंदलकर आणि पायल जाधव एकत्र दिसणार
अभिनेत्री आता लवकरच नवीन सिनेमातून, एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जयंती २, या असे सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हे पोस्टर शेअर करताना लिहिले, “ते काय आहे ज्यामुळे तुमचे, समाजाचे आणि देशाला नुकसान होत आले आहे? ते काय आहे, ज्याचा लोकांना त्रास होत असतो; पण त्यावर बोलायची कुणाचीही तयारी नसते? त्या समस्येवर आता उघडपणे बोलावं लागेल. तरुणांना आणि महिलांना ते सत्य आता जगासमोर मांडावं लागेल. त्यामुळे ‘जयंती २’ची चर्चा तर होणारच…”
पायल जाधवबरोबरच या सिनेमात प्रियदर्शिनी इंदलकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबरच, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, मानसी सुभाष हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
प्रियदर्शिनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमधून लोकप्रिय झाली. तिला या शोमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. तिने काही सिनेमांतही काम केले आहे. ‘फुलराणी’, ‘नवरदेव बीएस्सी अॅग्री’, ‘गाडी नंबर १७६०’, ‘चिकी चिकी बुबूम बूम’, ‘गांधी टॉक्स’, ‘सोयरीक’, ‘लग्नाचा शॉट’ अशा अनेक सिनेमांत तिने काम केले आहे.
आता या सिनेमात तिची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
