कलावंत कोणत्याही प्रांतातील असो, कोणत्याही क्षेत्रातील असो…त्याच्या कलेच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचा असतो तो ध्यास. हा ध्यास कलावंताला अनेक अग्नीदिव्य पार करायला लावतो आणि यातून जो कलावंत तयार होतो..तो असतो कलेचा अस्सल उपासक. कलेच्या याच ध्यासाचं सार सांगताना, ‘घुंगरु पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं’ असं समर्पणाचं तत्व सांगणारा ‘फुलवरा’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेला आणि रवी जाधव यांचं दिग्दर्शन असलेला ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण तयार झालं आहे. ही उत्सुकता यातील कलाकारांविषयी, यातील संगीताबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाची कथा काय असेल? याबद्दलची आहे. टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा रिव्हिल करण्यात आलेला नाही. हा प्रवास कुठे जल्लोषपूर्ण आहे, कुठे अडखळणारा आहे तर कुठे रक्ताने माखलेलाही आहे. या सगळ्यांत कळसाध्याय गाठणारं हर्ष – विजय यांचं संगीत. एकंदरीत लावणी कलावंतांच्या जीवनाचा एक मोठा प्रवास यातून पाहायला मिळणार याची प्रचिती या टीझरमधून येत आहे.
साधारण, १७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नटरंग’ चित्रपटाने केवळ लावणीलाच नाही तर मराठी चित्रपटांनाही नवसंजीवनी देण्याचं काम केलं होतं. या चित्रटाने मराठी मनोरंजनविश्वात एक इतिहास रचला होता. आता पुन्हा एकदा लावणी आणि तमाशाच्या विश्वाचा प्रभावी अनुभव देण्यासाठी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ‘फुलवरा’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.
‘फुलवरा’बद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “लावणीचा विचार करताना आपल्या डोळ्यांसमोर तिचा ठेका, रंगमंचावरची ऊर्जा आणि कलाकारांची अदाकारी येते, पण या प्रत्येक गोष्टीमागे असते ती वर्षानुवर्षांची मेहनत आणि कलेशी असलेली अतूट बांधिलकी. ‘फुलवरा’च्या टीझरमधून आम्हाला हाच भाव पोहोचवायचा होता. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांतले घुंगरू आणि त्यांना लागलेले रक्त-माती ही त्या प्रवासाची प्रतीकं आहेत. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ ही ओळ आमच्यासाठी केवळ संवाद नाही, तर लावणी जगणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या भावनेचं प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्राच्या या समृद्ध लोककलेमागची जिद्द, तिच्यावरचं प्रेम आणि ती जपण्यासाठी घेतले जाणारे कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, हा ‘फुलवरा’मागचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
लोककलेच्या विश्वात आपल्या वेगळ्या सादरीकरणाने लक्ष वेधून घेणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय या संगीतकार जोडीने ‘फुलवरा’ला संगीत दिलं आहे. ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. लोकसंगीताची परंपरा, त्यातील अस्सलपणा आणि आजच्या पिढीशी संवाद साधणारी मांडणी यांचा संगम या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
