Pooja Sawant Adhir Man Zhale Song Shooting Secret: पावसाळा सुरू झाला की त्याचा आनंद घेण्यासाठी काही गाणी हमखास लावली जातात, यातील एक गाणं म्हणजे ‘अधीर मन झाले.’ पूजा सावंतच्या या गाण्याने प्रत्येकाला निसर्ग सौंदर्याची आणि त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण येते. आता पूजा सावंतने या गाण्याच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या आहेत. तिने चक्क दोन दिवस तशीच भिजलेली साडी परिधान केल्याचा खुलासा स्वतः केला आहे.

मराठी कलाविश्वातील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सौंदर्यामुळे व अभिनयामुळे तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपल्या प्रभावी अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूजाचे ‘अधीर मन झाले…’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. श्रेया घोषालच्या आवाजाची जादू आणि पूजाच्या सौंदर्याने खुललेल्या या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा पूजा सावंतने सांगितला आहे.

‘अधीर मन झाले’ गाण्याच्या शूटिंगवेळी पूजा सावंतने नेसलेली ओली साडी

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा सावंतने या गाण्याच्या शूटिंगसाठी दोन दिवस तशीच भिजलेली साडी नेसल्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “‘अधीर मन झाले’ या गाण्याचं दोन दिवस शूटिंग होतं. पहिल्या दिवशी मी शूटिंग करताना चिंब भिजले होते. त्यावेळी पर्याय म्हणून दुसरी साडी नव्हती. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशीसुद्धा तीच साडी नेसावी लागली.”

पुढे ती म्हणाली, आदल्या दिवशी शूटिंग झाल्यानंतर ती भिजलेली साडी वाळत घातली होती. पण, दुसऱ्या दिवशी सकाळीच ‘कॉल-टाईम’ होता, त्यामुळे आदल्या दिवशीची साडी वाळलीच नव्हती, त्यामुळे पुन्हा तीच भिजलेली ओली साडी नेसून मी दुसऱ्या दिवशी शूटिंग केलं. पण, तो खूपच मजेशीर आणि चांगला अनुभव होता. त्यावेळी आम्ही खूप मज्जा केली.

पुढे पूजा सावंत म्हणाली, “मला स्वतःला पावसात भिजायला खूप आवडतं, त्यामुळे मला पावसाचा, बेडकांचा किंवा सापांचा काहीच त्रास झाला नाही. मी साडीमध्येसुद्धा खूप ‘कंफर्टेबल’ होते. माझ्यासाठी या गाण्याचं शूटिंग म्हणजे एक पावसाळ्यातील सहल होती.”

दरम्यान, २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘निळकंठ मास्तर’ या सिनेमातील ‘अधीर मनं झाले…’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या या गाण्याला अजय-अतुलने संगीत दिले होते, तर श्रेया घोषालने मधूर आवाजात गायलेल्या या गाण्यात पूजा सावंत झळकली होती. निसर्गसौंदर्य आणि पावसामध्ये शूट केलेले हे गाणे पूजा सावंतच्या हिट गाण्यांपैकी एक ठरले.