Pooja Sawant Car Accident Satara: मराठी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूजा सावंतच्या गाडीचा सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे अपघात झाला आहे. ती तिच्या आगामी ‘कप-बशी’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याहून सांगलीला जात असताना हा अपघात घडला.

रस्त्यात तीन गाड्या एकमेकांवर भीषण पद्धतीने आदळल्या. या गाडीतून पूजा सावंतसोबत अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे देखील प्रवास करत होते. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने पूजा सावंतसह सर्वजण पूर्णपणे सुखरूप आणि सुरक्षित आहेत.

दरम्यान, कप-बशी हा चित्रपट १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाची टीम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनसाठी जात आहे. सांगलीला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना ही धक्कादायक घटना घडली. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत.

कप-बशी चित्रपटाची कथा

पारंपरिक पद्धतीने लग्न जमवताना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या पत्रिका जुळतात का हे पाहण्याची प्रथा आहे. मात्र, आजच्या काळात उच्च शिक्षित असलेली नवरी मुलगी होणाऱ्या सासूसमोर अत्यंत चमत्कारिक अट ठेवते. ती अट म्हणजे सासू-सुनेची पत्रिका जुळली पाहिजे. या अटीनंतर काय धमाल होते याची मनोरंजक गोष्ट ‘कप-बशी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.