Pooja Sawant shares anecdote: २०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे, कमलेश सावंत असे अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

या सिनेमातील पूजा सावंत व अंकुश चौधरी यांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडली होती. तसेच सिनेमातील डायलॉगचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. आता पूजा सावंतने एका मुलाखतीत तिच्या कलरफुल या नावाबद्दल सांगितले आहे.

“आयुष्यभर प्रेक्षकांनी मला याच नावाने…”

पूजा सावंतने नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. ‘दगडी चाळ’ सिनेमातील कास्टिंगबद्दल ती म्हणाली, “पोस्टर बॉईजमधील काम बघून अंकुश दादांनी मला ‘दगडी चाळ’साठी विचारलं.” पुढे तिला मिळालेल्या कलरफुल या नावाबद्दल ती म्हणाली, “मी याचं श्रेय अंकुश सर, प्रेक्षकांना आणि चंद्रकांत कणसे यांना देईन.”

पुढे ती म्हणाली, “अंकुश आणि चंद्रकांत सर यांनी मला कलरफुल हे नाव दिलं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेने त्याला इतकं मोठं केलं की कदाचित कुणी मला माझ्या नावावरून ओळखत नाही, पण कलरफुल या नावावरून ओळखतात. मला असं वाटतं की, आयुष्यभर प्रेक्षकांनी मला याच नावाने ओळखावं, मला हे नाव फार आवडतं.”

दगडी चाळ चित्रपटातील शूटिंगचा एक किस्सा सांगताना पूजा सावंत म्हणाली, मी त्याआधी कधीही रंगपंचमी खेळली नव्हती. कोणीतरी येऊन रंग आपल्याला लावतं, ते रंग आपल्या चेहऱ्याला लागतात हे मला आवडायचं नाही. शूटिंगच्या दिवशी मी अंकुश सरांना म्हटलं होतं की, सर थोडा कमी रंग लावा, मला आवडत नाही.”

पुढे हसत ती म्हणाली, “माझं ते चुकलं. त्यानंतर त्यांनी मला खूप रंग लावला. त्या क्षणी ते कलरफुल नाव हे सुचलं. आधी ते स्क्रिप्टमध्ये नव्हतं. अंकुश सर आणि चंद्रकांत सर यांच्यामध्ये याबद्दल चर्चा झाली की सूर्या तिला असं म्हणणार की, ‘ये कलरफुल छान दिसतेस. ‘ तर इतक्या नकळतपणे ते नाव आलेलं आहे. त्यानंतर मला रंगपंचमी खेळायला आवडायला लागली. मला रंग आवडायला लागले”, असे म्हणत पूजाने तिला कलरफुल हे नाव कसं पडलं, याबद्दल सांगितलं.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचं तर नुकतीच ती ‘सखे ग साजणी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिच्याबरोबर अभिजीत खांडकेकर तसेच प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत दिसले. आता या चित्रपटानंतर पूजा ‘सालबर्डी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे पूजाला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता तिच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे या सिनेमालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच लवकरच पूजा ‘कप बशी’ या सिनेमातदेखील दिसणार आहे.