Pooja Sawant Dance Video : महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पूजाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येकाची मनं जिंकून घेतली आहेत. पण, याचबरोबर अभिनेत्री उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. तिची भन्नाट एनर्जी, दिलखेचक अदा, चेहऱ्यावरचे सुंदर हावभाव कायम सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पूजाने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पूजा सावंत नुकतीच हृतिक रोशन व प्रीती झिंटा यांच्या सुपरहिट गाण्यावर थिरकली आहे. जवळपास २६ वर्षांपूर्वी हृतिक-प्रीतीची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन काश्मीर’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामधील ‘बुमरो’ गाणं सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं. प्रीती झिंटाचे सुंदर हावभाव, तिचा लेहेंगा या सगळ्या गोष्टींची आज २६ वर्षांनंतरही तरुणाईमध्ये चर्चा रंगते.

पूजा सावंतला सुद्धा ‘बुमरो’ गाणं खूपच आवडतं. अभिनेत्री स्वत:च्या लग्नातील हळदीला सुद्धा या गाण्यावर थिरकली होती. आता पुन्हा एकदा पूजाने त्याच एनर्जीसह ‘बुमरो’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी प्रसिद्ध कोरिओग्राफर ओम पूजासह ‘बुमरो’ गाण्यावर थिरकला आहे. ओमसह त्याच्या संपूर्ण टीमचे अभिनेत्रीने आभार मानले आहेत.

‘बुमरो’ गाण्यावर डान्स करताना पूजाची एनर्जी थक्क करणारी होती. यावर नम्रता संभेरावने या डान्स व्हिडीओच्या कमेंटमध्ये हार्ट इमोजी दिले आहेत. तर गश्मीर महाजनीची पत्नी गौरीने, “किती सुंदर डान्स केलाय मित्रांनो….गाण्याला खरा न्याय दिला.” अशी कमेंट करत पूजाचं कौतुक केलं आहे.

याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “लय भारी पूजा…याला म्हणतात डान्स”, “काय डान्स केलाय”, “सुपर डान्स”, “वाह वाह सो क्युट”, “किती सुंदर डान्स केलाय” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘दगडी चाळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे. लग्नानंतर पूजा पतीसह परदेशात शिफ्ट झालीये. मात्र, कामानिमित्त ती भारतात येऊन-जाऊन असते. आता लवकरच पूजा ‘सखे गं साजणी’ आणि ‘कपबशी’ या सिनेमांमध्ये झळकणार आहे.