Pooja Sawant : महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. पूजाच्या सहज-सुंदर अभिनयाचे लाखो चाहते आहेत. पण, पूजाच्या फिटनेसचं सुद्धा तेवढंच कौतुक केलं जातं. पूजा दररोज पहाटे वर्कआऊट करते, आणि जेव्हा अभिनेत्री वर्कआऊट करत नाही तेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग करते. याशिवाय पूजा दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिते. आता ज्या लोकांना स्वत:चं वजन कमी करायचं असतं, ते लोक सर्वात आधी भात खाणं बंद करतात. पण, पूजाचं Comfort फूड भात आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने वर्कआऊट आणि डाएट व्यवस्थित असेल काही कोणाचंही वजन वाढत नाही, असं चाहत्यांना सांगितलं.

पूजा लोकमत फिल्मीशी संवाद साधताना म्हणाली, “मी डाएट प्लॅनबद्दल काय सांगू? मी मुळात कोकणातली असल्यामुळे मी भात खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. मला भात प्रचंड आवडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात Comfort फूड असतं…तसं सांगायचं झालं तर, भात माझ्यासाठी Comfort फूड आहे. अर्थात, भात खातेय त्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्या बॅलन्स कराव्या लागतात. मी पूर्वी जरा जास्त भात खायचे….आता मी ते प्रमाण थोडं कमी केलंय.”

“मी अगदी खरं सांगतेय बरं का…मी खरंच आधी खूप जास्त भात खायचे. पण, तेव्हा कसं होतं…वय वेगळं होतं. मी तेवढा भात जरी खाल्ला तरीही वर्कआऊट सुद्धा खूप करायचे. पण, आता असं नाहीये…मी माझ्या फूड हॅबिट्समध्ये आता बऱ्यापैकी बदल केला आहे.” असं पूजाने सांगितलं.

भातामुळे खरंच वजन वाढतं का?

भातामुळे खरंच वजन वाढतं का? हा प्रश्न पूजाला विचारला असता ती म्हणाली, “नाही…! मी स्वत: तुमच्यासमोर एक उदाहरण आहे. मी रोज भात खाते. असा वाफाळता इंद्रायणी म्हणा..बासमती म्हणा किंवा आंबेमोहोर म्हणा…मला जेवताना भात लागतोच. त्यामुळे तुम्ही सगळेही भात खाऊ शकता. प्लीज खा…पण, मी जसं सांगतेय तसं Balance करा. तुमचं वर्कआऊट आणि डाएट हे तुम्हाला Balance करता आलं पाहिजे. जर ते व्यवस्थित असेल तर काही कोणाचंही वजन वाढत नाही.”

दरम्यान, पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘सखे गं साजणी’ सिनेमात झळकली. आता यानंतर ती येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे.