Pooja Sawant : ‘महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वैयक्तिक आयुष्यात, फेब्रुवारी २०२४ मध्ये पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पूजाचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे. लग्नानंतर पूजा ऑस्ट्रेलिया-भारत असा प्रवास करत असते. कारण, तिचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. हा लाँग डिस्टन्स संसार अभिनेत्री कसा मॅनेज करते याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पूजाचा नवरा सिद्धेश हा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. पूजा सावंत ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “माझा संसार टिपिकल असा नाहीये. कारण, अर्थात आमचा संसार लाँग डिस्टन्स सुरू आहे. आम्ही भेटण्यासाठी अशी वेळ वगैरे काहीच ठरवलेलं नसतं की, या-या महिन्यात आपण भेटायचंय. जेव्हा इथे माझं कोणतंच काम सुरू नसतं किंवा काम कमी असतं…तेव्हा मी ऑस्ट्रेलियाला जाऊन माझ्या नवऱ्याला भेटते. त्याच्या प्रोफेशनमध्ये त्याला फार सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे तो फार प्रवास करू शकत नाही. नशिबाने आपलं प्रोफेशन असं आहे की, एखादी सुट्टी मिळू शकते. याशिवाय दोन प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये आपल्याला ब्रेक सुद्धा मिळतो. त्यामुळे माझं ऑस्ट्रेलियाला येणं-जाणं जास्त असतं. आता हळुहळू आम्हाला सगळं जमतंय.”
“मी लग्नानंतर संसारासाठी जाणीवपूर्वक वेळ दिला. पण, मला इथल्या सुद्धा सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या होत्या. पहिलं वर्ष माझ्यासाठी आणि सिद्धेशसाठी खूप कठीण होतं. पण, आता आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतोय.” असं पूजाने सांगितलं.
पूजाचं लग्न कसं जमलं?
“आम्ही अरेंज मॅरेज पद्धतीनेच भेटलो. मला त्याचं स्थळ आलं. आम्ही फोनवर आधी बोललो. जसं टिपिकल अरेंज मॅरेज होतं, तसंच आई-बाबांनी स्थळ आणलं होतं. पण त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळ घेतला. दीड वर्ष आम्ही फोनवर बोलत होतो. हळूहळू प्रेमात पडलो, एकमेकांना जाणून घ्यायला लागलो. आम्ही एकत्र कुटुंब पिकनिकला सुद्धा गेलो होतो. मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.” असं पूजाने सांगितलं.
दरम्यान, पूजा आता लवकरच ‘सालबर्डी’ सिनेमात झळकणार आहे. यामध्ये ती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारेल. हा सिनेमा १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
