अरेंज मॅरेज हा विषय काहींना खूप जुनाट वाटतो तर काही आजही अरेज मॅरेजवर विश्वास ठेवणारे आहेत. इंडस्ट्रीतही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अरेंज मॅरेज केलं आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत. पूजाने दोन वर्षांपूर्वी सिद्धेश चव्हाणसह लग्न केलं. अशातच अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्यावेळचा एक किस्सा शेअर केला आहे.

पूजा अलीकडे अनेक चित्रटपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही दिवसांपूर्वीच तिचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले त्यापैकीच एक म्हणजे ‘कप बशी’. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत आणि पूजा प्रमुख भूमिकांमध्ये होत्या. या चित्रपटात पूजाची तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर नाही तर सासूबरोबर पत्रिका जुळवून पाहण्याची अट असते. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने तिचा खऱ्या आयुष्यात या सगळ्यावर विश्वास आहे का आणि तिने पत्रिका जुळवून पाहिली आहे का याबद्दल सांगितलं आहे.

पूजाने लग्नापूर्वी पाहिलेली पत्रिका

पूजाने नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत तिला तुझा पत्रिकेवर विश्वास आहे का आणि तेव्हा तुम्ही पत्रिका पाहिली होती का? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो माझा पत्रिकेवर पूर्ण विश्वास आहे. कारण – ते जे शास्त्र आहे ना ते खूप रंजक आहे. त्याला एक वैज्ञानिक बाजूसुद्धा आहे आणि जे याचा अभ्यास करतात त्यांना कळत असेल मी काय म्हणते. माझा विश्वास आहे पत्रिकेवर मी पत्रिका पाहिली होती”.

अभिनेत्री याबद्दल पुढे कारण सांगत म्हणाली, “कारण मला त्या गोष्टी आवडतात. म्हणून मी पाहिली होती पण, मला कळलं की अरे फार काही गुण जुळत नाहीये वगैरे पण, माझे आणि सिद्देशचे विचार इतके जुळले आमची भेट झाल्यानंतर की हे जरा मागे राहिलं आणि मग मी लग्न केलं.”

दरम्यान, पूजा सावंत अनेकदा तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील किस्से, गमती जमती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असत आणि तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.